Onion Price: देशात टोमॅटोच्या दरात (Tomato Price) विक्रमी वाढ झाली आहे. पण आता टॉमेटोपाठोपाठ आणखी एका पदार्थामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याची किंमत वाढू शकते. पावसाळ्यामुळे कांद्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत देशात कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.


गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील (Maharashtra News) पाच जिल्ह्यांत कांद्याच्या किरकोळ किमतींत लक्षणीय वाढ झाल्याचं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही किंमत कमी असली तरी, सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 35.88 रुपये होती, 2021 मध्ये हीच किंमत काहीशी घसरली आणि सरासरी किरकोळ किंमत 32.52 रुपये झाली. तर 2022 मध्ये ही किंमत 28.00 रुपये प्रति किलो होती. तसेच, यंदाच्या वर्षात म्हणजेच, 2023 मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. मात्र, येत्या काही महिन्यांत कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणू शकतो. 


सरकारनं किती कांदा खरेदी केला? 


सरकारनं सुमारे दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून सुमारे 0.14 दशलक्ष टन कांद्याचा साठा खरेदी केला आहे. केंद्र सरकार 2023-24 हंगामासाठी 3 लाख टन कांदे बफर स्टॉकमध्ये ठेवणार असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एप्रिलमध्ये सांगितलं होतं. तसेच, गेल्या हंगामात 2022-23 मध्ये 2.51 लाख टन कांदा बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, 2021-22 मध्ये कांद्याचं उत्पादन 31.69 दशलक्ष टनांवरून 31.01 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज असल्याचा अहवाल भारत सरकारनंच जून महिन्याच्या सुरुवातीलाच दिला होता. 


सरकार एखादी गोष्ट बफर स्टॉकमध्ये का ठेवते? 


देशात जेव्हा जेव्हा दुष्काळ किंवा अन्नधान्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवते त्यावेळी नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, हे लक्षात घेऊन सरकारनं बफर स्टॉकची व्यवस्था केली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा या बफर स्टॉकचा वापर केला जातो. याशिवाय एखाद्या खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या तर त्या किमती स्थिर ठेवण्यासाठीही बफर स्टॉक ठेवला जातो. जेव्हा पुरवठा कमी असतो आणि किंमती वाढत असतात, त्यावेळी सरकार ही पावलं उचलतं. रब्बी कांदा एप्रिलमध्ये काढणीला येतो. हा कांदा एप्रिलपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हणजेच, खरीप पीक काढणीपर्यंत ग्राहकांची मागणी पूर्ण करतो. 


80 रुपयांपर्यंत पोहोचलेत टोमॅटोचे दर 


देशभरात सर्वात आधी उष्णतेची लाट आणि त्यानंतर अवकाळी पाऊस यामुळे टोमॅटोच्या दरांवर परिणाम झाला आहे. पाऊस आणि अति उष्णतेमुळे पीक निकामी झाल्यामुळे बळीराजाचं नुकसान झालं आहेच, पण त्यासोबतच देशभरात पुरवठ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत टोमॅटोचे भाव 10 ते 20 रुपयांवरुन 80 ते 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. म्हणजेच, प्रति किलो 70 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. हवामानामुळे टोमॅटोशिवाय इतर भाज्यांचे दर घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढले आहेत.