मुंबई : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घालण्याचा निर्णय घेतल्याने याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले असून, यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. बीड (Beed), नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर, काही ठिकाणी कांद्याचा लिलाव देखील बंद पाडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील कांदा प्रश्न अधिकच तापतांना पाहायला मिळत आहे. 


मराठवाड्यात दर घसरले..


केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. बीडच्या कडा येथील मराठवाड्यात सर्वात मोठे असलेल्या कांदा बाजारपेठेत कांद्याला 25 रुपये एवढा भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याची निर्यात सुरू असताना कांद्याला पन्नास रुपयांचा भाव मिळत होता. मात्र, आता कांद्याची निर्यात अचानक रद्द केल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. एकरी  50 हजार रुपये खर्च करून बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने केलेला खर्च देखील शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचं चित्र आहे. 


नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद...


केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी आणि व्यापारी दोघांमध्ये उद्रेक बघायला मिळत आहेत. शुक्रवारी  ठिक-ठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर आजपासून लिलाव बंद करण्याची हाक कांदा व्यापाऱ्यांनी दिली होती. त्याला जिल्ह्यातील बाजार समितीत प्रतिसाद मिळतोय. काही शेतकरी 60 ते 70 किलोमीटर अंतर पार करून चांदवड, पिंपळगाव बाजार समितीत जाऊन नाशिक बाजार समितीत पोहचत आहेत. त्यामुळे कांदा गोणी लिलाव होणाऱ्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पहिल्यांदाच खुल्या ट्रॅक्टरमधून कांदा दाखल झालाय. शेतकरी दूरवरून आल्यानं त्याचे नुकसान होऊ नये म्हणून सुरवातीला आलेला कांदा घेत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र, यावेळी नाशिक जिल्हा नाही तर संपूर्ण देशभरात बंद पुकारला जाईल असा विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार यावर काय मार्ग काढणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


अहमदनगरच्या बाजारपेठेत कांद्याचे दर घसरले... 


केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहे. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे अनेक ठिकाणी कांद्याचे दर पडल्याने कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहे. दरम्यान, असे असतांना अहमदनगरच्या नेप्ती बाजारामध्ये आज कांद्याचे लिलाव सुरू होते. दरम्यान कांद्याचे दर 18 ते 20 रुपयांनी घटल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. 


राज्यभरात संताप... 


यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशात उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यात शेतकऱ्यांनी कसेबसे कांद्याच्या पिकाला जगवलं. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका