Nandurbar Agriculture News : सध्या ज्वारीच्या (Sorghum) बाजारात तेजी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्वारीला चांगला दर मिळत असल्यानं उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यामुळं ज्वारी उत्पादक शेतकरी (Farmers) समाधान व्यक्त करत आहेत. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nandurbar Agriculture Market Committee) पहिल्यांदाच ज्वारीला 2 हजार 966 रुपयांचा दर मिळाला आहे. चांगला दर मिळत असल्यामुळं उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पीक घेतले जाते.  तसेच शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावरती भागात देखील मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षी राज्यभरात ज्वारीला क्विंटलला हजार ते पंधराशे रुपयांचा दर मिळत असतो. मात्र, यावर्षी ज्वारीचे दर तेजीत असल्याचे चित्र नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे. ज्वारीला क्विंटलला 2 हजार 966 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.


परतीच्या पावसाचा पिकाला मोठा फटका


यावर्षी राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं होते. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. सोयाबीन, कापूस, फळबागा यासह भाजीपाला पिकांना याचा मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक या पावसामुळं वाया गेलं आहे. या पावसाचा ज्वारीच्या पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात ज्वारीचं नुकसान झालं होतं. मात्र, काही ठिकाणी या अतिवृष्टीतून देखील शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. अशातच सध्या ज्वारीला चांगला दर मिळत असल्याने थोडेफार नुकसान यातून भरुन निघण्यास मदत होत आहे. परतीच्या  पावसामुळं काळी पडलेल्या ज्वारीला बाराशे ते सतराशे रुपयापर्यंत दर मिळत आहे. ज्वारीच्या गुणवत्तेवर दर ठरवले गेले असून यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, धान्याच्या वाढत्या दरामुळं महागाई वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


ज्वारीला चांगल दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी


नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती चांगल्या प्रतीच्या ज्वारीला प्रतिक्विंटल 2 हजार 966 रुपयांचा दर मिळत असून, हा आजपर्यंतचा सर्वाधिक दर असल्याचे व्यापाऱ्यासह शेतकऱ्यांनी सांगितले. बाजार समितीत दररोज पंधराशे ते दोन हजार क्विंटल ज्वारीची आवक होत असून ज्वारीला दर चांगला मिळत आहे. त्यामुळं शेजारील जिल्ह्यातील आणि गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावरती भागातील शेतकरी ज्वारी विक्रीसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चांगले दर मिळत असल्यानं यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.  


महत्त्वाच्या बातम्या:


Nagpur Agriculture Department : कृषी विभागात अधिकाऱ्यांचा दुष्काळ, अनेक जबाबदाऱ्या प्रभारींच्या खांद्यावर