नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 25 दिवसांपासून पाऊस (Rain) नसल्याने सोयाबीन मूग, उडीद, इतर पिकांचे उत्पादन येणार नसल्याने पिकांवर रोटाव्हेटर (Rotavator) फिरवून जनावरांना चारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर दुसरीकडे शहादा तालुक्यात मुबलक पाणीसाठा असला तरी अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे पपई आणि केळीच्या बागाही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचे सुलतानी संकट या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाली कोण असा प्रश्न आता जिल्ह्यातील शेतकरी विचारु लागला आहे.


पिकांवर रोटाव्हेटर गुरांना चारा देण्याची वेळ


खरीप हंगामात जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन, मूग, उडीद, चवळी, तूर यासारख्या कडधान्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता. मात्र फूल धारणा आणि फळ धारणाच्या वेळेस पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन आणि इतर पिकांचे उत्पादन येणार नसल्याची स्थिती आहे. अशा स्थितीत पीक जळत असल्याने शेतकरी आता या पिकांवर रोटाव्हेटर फिरवून गुरांना चारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्याने करावं तरी काय सत्ताधारी लक्ष देत नाहीत, विरोधक त्यांना जाब विचारत नाही, अशी परिस्थिती असल्याने आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.


वीज देऊ शकत नाही तर सरकार काय कामाचे? शेतकऱ्यांचा सवाल


पाणी असूनही पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने केळी आणि पपई पिकेही संकटात आले आहेत. एकीकडे शेतकरी पिके जगवताना संघर्ष करत आहे तर दुसरीकडे पाणी असूनही पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. एकीकडे सरकार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या नावाने आणि चांद्रयानासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे, मात्र शेतकऱ्यांना मूलभूत अशी वीज देऊ शकत नसतील तर हे सरकार काय कामाचे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.


सरकारने शेतकरी हिताच्या गप्पा मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना दिलासादायक विद्युत पुरवठा करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. बोलाचा भात आणि बोलाची कडी अशी गत राज्य सरकारची झाली असून दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत असताना वीज मिळत नसल्याने ग्रामीण भागात तीव्र असंतोष आहे.


हेही वाचा