Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. गेले दोन दिवस झालेल्या ढगफुटीनंतर हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. तसेच ठिबक, बैलगाडी, नांगर, पेरणीयंत्र अशी शेतीची अवजारेही वाहून गेली आहेत. तर दुसरीकडं पिके तर वाया गेलीच पण जमिनीही खरवडून गेल्याचे चित्र आहे. यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ तर आलीच, पण ज्या अवजारांनी पेरणी करतो, ती कृषी अवजारेच वाहून गेल्याने, आता ती पुन्हा खरेदी करण्याचीही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत.




नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं पिकं वाया गेली आहेत. तसेच जमिनीही खरवडून गेल्या आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या शेतजमिनी पूर्ववत होण्यासाठी वर्षानुवर्षे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. दरम्यान या अतिवृष्टीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रशसनाच्या फौजफाट्यासह पाहणी दौरे केले. ज्यात 100 टक्के तत्काळ मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. पण मदत तर दूर पण नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामेही अद्याप झाले नाहीत. अतिवृष्टीनंतर साहेबांच्या आलिशान गाड्या फौजफाट्यासह चिखल तुडवीत आल्या आणि निघून गेल्या. ज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र  जाग्यावरच राहिले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून तत्काळ मदतीची अपेक्षा करत आहे. दरम्यान, एका दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पण अद्याप जिल्हा प्रशसनाकडून पिकाचे पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळं शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आहे. 




मराठवाड्यात 387 गावांना पुराचा फटका


दरम्यान, मराठवाड्यात 8 ते 10 जुलैला  झालेल्या जोरदार पावसानं 387 गावांना पुराचा वेढा पडला आहे. यात हिंगोलीतील 62, नांदेडमधील 310, बीडमधील 1, लातूरमधील 8, उस्मानाबादमधील 2 गावांचा समावेश आहे. या दोन दिवसात 160 मोठी, तर 30 लहान जनावरे दगावली आहेत, तर 52 हजार 149 हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं असून, 10 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे.
8 पुलांचे नुकसान झाले आहे. तर 5 लोकांचा मृत्यू झाला असून, यात बीड 4 तर नांदेडमध्ये 1 तर  4 जण जखमी झाले आहेत.


महत्वाच्या बातम्या: