नागपूर : आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतीत वापर केला तर काय करिश्मा होऊ शकतो याचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यातले संत्रा उत्पादक शेतकरी विजय बिजवे यांनी दिला. दोन वर्षांपूर्वी नापिकीमुळं बिजवे यांनी संत्रा बाग तोडण्याचं ठरवलं होतं. पण कृषी पदवी घेतलेल्या मुलानं त्याला विरोध केला आणि आग्रह करुन संत्रा बागेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यास सांगितलं. बिजवे यांनी बाग टिकवली आणि अक्षरशः क्रांती घडली.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातल्या खरपी गावात विजय बिजवे यांची ही आठ एकरांवरची संत्रा बाग आहे. दहा वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीनं संत्र्याची लागवड करायचे. पण सारी काळजी घेऊन आणि मेहनत करूनही त्यांना म्हणावं तसं उत्पादन होत नव्हते. खर्च आणि उत्पन्नाचं गणित जुळत नव्हतं. त्यामुळे निराश झालेल्या विजय बिजवे यांच्या डोक्यात वर्षभरापूर्वी बाग तोडावी आणि शेती विकावी असे नकारात्मक विचार येऊ लागले होते.
मुलाच्या आग्रहाखातर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
बीएससी ऍग्रीकल्चर असलेल्या मुलाच्या आग्रहाखातर त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतात वापर केला आणि नव्यानं सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या आठ एकर शेतीचे गुगल मॅपिंग करून घेतले. त्यानंतर पुणे येथील "मॅप माय क्रॉप" या कंपनीच्या सहाय्याने काही खास सेन्सर आपल्या शेतीत बसवले.
या खास सेन्सरच्या माध्यमातून बिजवे यांना त्यांच्या शेतजमिनीत असलेली पाण्याची उपलब्धता, मातीचा ओलावा, आर्द्रता, तसेच जमिनीचे उष्णतामान, मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स याबद्दलचा अचूक तपशील मिळविण्यास मदत झाली.
बिजवे यांना शेतातल्या वातावरणाची, मातीच्या स्थितीची आणि पिकांच्या वाढीची माहिती अचूक मिळायला लागल्यानंतर त्यांनी संत्रा झाडांना आवश्यक तेवढंच पाणी आणि औषधे वापरायला सुरुवात केली. त्यामुळं खर्चाची बचत तर झालीच, शिवाय फळांची वाढ ही जोमदार होऊ लागली. परिणामी प्रत्येक झाडावर किमान 800 ते 1200 संत्रा फळ दिसतातयत.
गेल्या 10 वर्षात मिळालं नाही एवढं उत्पन्न मिळण्याची बिजवे यांना अपेक्षा आहे. शेतीत एआय टेक्नॉलॉजी वापरणं कठीण नाही, थोड्याशा प्रशिक्षणाने अल्पशिक्षित शेतकरीही त्याचा अचूक वापर करू शकतो असं बिजवे आपल्या अनुभवातून सांगतात.
बिजवे यांनी एआय टेक्नॉलॉजीसह आणखी एक युक्ती केली. संत्र्याला बहर येण्याच्या काळात झाडाला पांढरा आणि काळा मावा रोग लागतो. त्यामुळं फुलोरा नष्ट होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणून बिजवे यांनी कुठलीही रासायनिक फवारणी करण्याऐवजी आपल्या बागेत गूळ, साखर आणि दुधाच्या मिश्रणाची फवारणी केली. त्यामुळे बागेत मधमाशांचा वावर वाढला आणि पॉलिनेशन म्हणजेच पराग सिंचन झालं. पर्यायानं उत्तम फुलोरा टिकून फळगळतीही थांबली आणि जोमदार फळं आली.
एक सेन्सर अडीच एकर जमिनीची पाण्याची आणि मूलद्रव्यांची उपलब्धता, जमिनीचे उष्णतामान, इत्यादी माहितीची नोंद ठेवतो. एआय टेक्नॉलॉजी वापरण्यापूर्वी बिजवेंना अंदाजे खर्च 5 लाख 50 हजार रुपयांचा लागवड खर्च येई. खर्च 5.50 लाख आणि उत्पन्न फक्त 5 ते 6 लाख, म्हणजे नफ्याऐवजी नुकसानच जास्त होई.
एआय टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर आठ एकरसाठीचा लागवड खर्च 4 लाखांपर्यंत खाली आला. पण उत्पन्न मात्र अंदाजे 25 ते 30 लाख रुपये इतके अपेक्षित आहे. बिजवे यांचा हा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी मोठा प्रेरणादायी आहे. आगामी काळात कृषी क्षेत्रात कशी क्रांती घडू शकते याची ही नांदी आहे.
आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचा वापर करून बिजवेंन उत्पादनात किमया घडवली. पण संत्रा उत्पादनासाठी मार्केटिंगची व्यवस्था नसल्यानं आपला माल व्यापारी सांगेल त्या किमतीला द्यावा लागला. अमरावती जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्प किंवा संत्रा मुंबई आणि दिल्लीच्या बाजारात वेगानं नेण्याची गरज आहे.