Marathwada Sowing : गेल्यावर्षी अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात (Marathwada) यंदा उशिरा पावसाने (Rain) हजेरी लावली असल्याने, याचे परिणाम खरीपाच्या पेरणीवर (Sowing) पाहायला मिळत आहे. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाची पेरणी रखडली होती. दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पेरणीला सुरवात झाली आहे. विभागातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी 50 लाख 26  हजार 42 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी केवळ 10 लाख 94 हजार 83 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच, फक्त 20 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.


मराठवाड्यात आतापर्यंत 108 सरासरी मिलीमीटर पाऊस पडला आहे. जून महिना कोरडा गेला, तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गेल्या आठवड्यात प्रत्यक्षात पेरणीला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत तीन आणि लातूर विभागत कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्यात लातूर विभागात आतापर्यंत 16 टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 29 अशी एकूण सरासरी 20 टक्के पेरणी झाली आहे. 


मराठवाड्यातील पेरणी परिस्थिती...



  • छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांचे एकूण पेरणी क्षेत्र 20 लाख 90 हजार 118 हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी आतापर्यंत 6 लाख 7 हजार 472 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागात करण्यात आली.

  • यामध्ये सर्वाधिक क्षेत्र 3 लाख 90 हजार 960  हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. मका 92 हजार 709 हेक्टर, तूर 24 हजार हेक्टर व इतर खरीप पिकांचा समावेश आहे.

  • लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली असे एकूण सरासरी पेरणी क्षेत्र 29 लाख 35 हजार 844 हेक्टर आहे. यापैकी 4 लाख 86 हजार 611 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 16 टक्के पेरणी झाली आहे.

  • यामध्ये लातूर विभागात सर्वाधिक 2 लाख 71 हजार 18 हेक्टर क्षेत्रांत सोयाबीनचा पेरा आहे. त्यानंतर 1 लाख 67 हजार 997 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यानंतर बाजरी, तूर, मूग, उडीद मका, भुईमूग आदी पिकांचा समावेश आहे.


पेरण्या रखडल्या... 


जून महिन्यात पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतांना, यंदा मात्र जुना महिना जवळपास कोरडा गेला आहे. आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मराठवाड्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र काही भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत फक्त 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे लवकर पाऊस न झाल्यास पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभं रहाण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Agriculture News : अकोला जिल्ह्यात पावसाची दडी, फक्त 12 टक्के क्षेत्रावर पेरणी; शेतकऱ्यांना खरीप हंगाम वाया जाण्याची भीती