Hingoli : राज्यात मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा (unseasonal rains) जोर वाढला आहे. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान (Agriculture Crop loss) होत असल्याचं चित्र आहे. यामुळं बळीराजा पुरता हैराण झाला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यामध्ये मागील आठ ते दहा दिवसापासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात फटका हा भाजीपालावर्णीय पिकांना बसत आहे. कारले, वांगे, टोमॅटो, मिरची यासारख्या पिकांना या पावसाचा फटका बसत आहे. 


भाजीपाला पिकांसह फळबागांचेही मोठं नुकसान


अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया जात आहेत. याचा मोठा आर्थिक पटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे. तर कुठे गारपीट पडत आहे. यामुळं भाजीपाला पिकांसह फळबागांचेही मोठं नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळं हिंगोली जिल्ह्यातील नहाद गावाच्या शेत शिवारातील भाजीपाला वर्णीय पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. हजारो रुपये खर्च करुन उभी केलेली कारल्याची पिक तुटून पडली आहेत. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या पावसानं हिरावला आहे. शेतकरी विनायक बोरगड यांनी सुद्धा एक एकरमध्ये एक लाख रुपये खर्च करुन या कारल्याच्या पिकाची लागवड केली होती. परंतू काल झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळं कारल्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.


राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी


राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळं कांदा, मका, भाजीपाला यासह फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कांदा, मका, भाजीपाला, फळबाग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं हाहाकार घातला आहे. शहरासह जिल्ह्यातील बहुताशं भागात अवकाळई पावसानं हजेरी लावली. नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे बोगद्यात साचले पाणी साचले आहे. पाण्यातून मार्गस्थ होताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसात रेल्वे बोगद्याची ही परिस्थिती आहे. पावसाळ्यात तर या बोगद्याची काय परिस्थिती राहणार? असा सवाल नागरिक उपस्थिक करत आहेत. गेल्या 4 वर्षापासून या ठइकाणी काम सुरुच आहे. अद्यापही काम पूर्ण झालं नाही. खांडबारा रेल्वे बोगदाच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या भुयाराजागी तलाव तयार झाला आहे. दरम्यान, या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.