पालघर : पालघर जिल्ह्यात (Palghar) शनिवार संध्याकाळपासून अवकाळी तुरळक पाऊस (Maharashtra Rain Update) सुरू असून शेतकरी बागायतदार पुन्हा एकदा संकटांत सापडला आहे. हंगामाच्या प्रारंभी जांबु पिकाची फळगळती होऊन आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान उपाययोजना अंमलात आणण्याचे मार्गदर्शन कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे. दोन लॉकडाऊन काळात या फळांची निर्यात खंडीत झाल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होऊन हंगाम वाया गेले होते.


डिसेंबर महिन्यापासून जांबु फळांच्या हंगामाला प्रारंभ होऊन जूनपर्यंत तीन ते चार वेळा फुलोरा येऊन उत्पादन घेता येते. गतवर्षी डिसेंबर मध्ये अवकाळी पाऊस झाल्याने या फळांच्या हंगामाला एक महिना विलंब झाला आहे. जानेवारी महिन्यात सफेद, हिरवे, फिके व गडद लाल तसेच गडद गुलाबी रंगातील ही फळे बाजारात येण्यास सुरुवात झाली आहेत. या टप्प्यात फळांची संख्या कमी असली, तरी प्रतिनग किंवा शेकड्यांनी विकल्या जाणाऱ्या या फळांना चांगला भाव असल्याची माहिती चिखले गावातील बागायतदार सुजय मोठे यांनी दिली. मुंबईसह शहरातील नागरिकांचे हे पसंतीचे फळ असून  हॉटेल व्यावसायिकांकडून सॅलेडसाठी लाल, हिरव्या जांबूला मोठी मागणी आहे.


दरम्यान हंगामाच्या प्रारंभी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने विषम वातावरण आणि फळमाशीच्या प्रदूर्भावाने फळगळातीचा धोका वाढला आहे. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करून उपाययोजना अंमलात आणण्याच्या सूचना कृषी तज्ञांनी केल्या आहेत. मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात उत्पादन येऊनही लॉकडाऊनमुळे बाजारात या फळांची मागणी रोडावल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यंदा पुन्हा जानेवारी महिन्यात संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन लागल्यास नुकसानीची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे.


कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ विलास जाधव यांनी म्हटलं आहे की, अवकाळी पावसानंतर बागेत फळमाशीचा प्रादुर्भावाची शक्यता वाढते. एकरी 4 फळमाशी सापळे लावून फळबागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल. तर हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी म्हटलं आहे की, पालघर जिल्ह्यात 8 व 9 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह