Solapur : करमाळा (Karmala) तालुक्यातील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Shri Adinath Sahkari Sakhar Karkhana) प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर देखील निवडणूक घेण्यास कसूर केल्यानं कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. प्रशासक म्हणून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखा परीक्षक वर्ग -1 बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा शिवसेनेच्या नेत्या रश्मी बागल यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे.  


श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक सोलापूर राजेंद्र कुमार दराडे यांनी दिली आहे. एकाच दिवसात आदेश काढल्यानंतर प्रशासकाने कारखान्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. यामुळे रश्मी बागल यांच्या गटास हा मोठा धक्का मानला जात आहे. कारखान्यावरती सध्या बागल गटाची सत्ता होती. आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रो ला भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया रद्द करुन कारखाना सहकारी तत्त्वावर ठेवण्यास आला होता. त्यामुळं आदिनाथ कारखाना राज्यभर गाजला. कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असल्यानं निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच गटातटांनी तयारी सुरु केली होती. मात्र, प्रशासक आल्यानं आता यापुढं कारखान्याची निवडणूक कधी होणार हे निश्चित नाही.


अचानकच कल्पना नसताना प्रशासक मंडळाची नेमणूक केली : धनंजय डोंगरे


प्रशासक मंडळ बरखास्त केल्यानंतर एबीपी माझाने कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांच्याशी संपर्क सादळा. यावेळी डोंगरे म्हणाले की, निवडणूक खर्च भरण्यासाठी 35 लाख रुपये भरण्यास कारखान्याला सांगण्यात आले होते. यापैकी आम्ही 10 लाख रुपये भरले होते. साखर विक्री करुन अन्य पैसे भरण्याचे आम्ही सांगितले होते. मात्र, अचानकच कल्पना नसताना प्रशासक कारखान्यावर आले आणि त्यांनी संचालक मंडळ बरखास्त केल्याचे डोंगरे म्हणाले. दरम्यान, यावर्षी 11 जानेवारी 2023 कारखाना सुरु झाला होता. तरीदेखील आम्ही महाराष्ट्रातील 77 हजार टन ऊसाचं गाळप केलं आहे. शेतकऱ्यांची सर्व देणी दिली आहेत. कारखाना तीन वर्ष बंद होता. त्यानंतर यावर्षी आम्ही प्रयत्न करुन कारखाना सुरु केल्याचे डोंगरे म्हणाले. कामगारांचे पगार व्यवस्थित केल्याचे डोंगरे म्हणाले. दरम्यान, प्रशासक मंडळाला आम्ही सहकार्य करणार असल्याचे डोंगरे म्हणाले. 


 साखर कारखाना वाचावा एवढीच आमची भावना : संजयमामा शिंदे 


दरम्यान, करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी देखील या कारखान्याची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. या निर्णयानंतर एबीपी माझाने करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, साखर कारखाना वाचावा एवढीच आमची भावना होती. त्यामुळं आम्ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. प्रशासक जरी नेमला तरी काही अडचण नाही. प्रशासकाला जे सहकार्य लागेल ते करण्याची आमची तयारी असल्याचे संजयमामा शिंदे यांनी सांगितलं.   


मंत्री तानाजी सावंत यांच्या मदतीनं कारखाना सुरु करण्याचे प्रयत्न


आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा, यासाठी रश्मी बागल, माजी आमदार नारायण पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मदतीने प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले होते. मात्र, हा कारखाना राजकीय नेत्यांच्या हाती राहण्याऐवजी तो आता प्रशासकाच्या हाती गेला आहे. तोही केवळ निवडणूक खर्च न भरल्यानं. त्यामुळं तो करमाळ्यातील राजकीय नेत्यांना मोठा धक्का मानला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Rajaram Sakhar KarKhana : राजाराम साखर कारखाना निवडणुकीत विरोधी सतेज पाटील गटाला सुरुवातीलाच तगडा झटका; 29 उमेदवार अपात्र