Ravikant Tupkar : सध्या राज्यातील कापूस  (Cotton) आणि सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण सातत्यानं दरांमध्ये घसरण होत आहे. या मुद्यांवरुन सातत्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आवाज उठवत आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांची भेट घेतली. सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसंदर्भात राज्य सरकारनं तातडीने केंद्र सरकारशी चर्चा करावी. याबाबत पाठपुरावा करुन शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेण्याची मागणी तुपकरांनी केली. याबाबत मुनगंटीवार यांनी तातडीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या दरवाढीसाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.


तुपकरांनी काढले होते मोर्चे


सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या  प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर सातत्यानं आवाज उठवत आहेत. याबाबत त्यांनी आंदोलनही केलं होतं. बुलढाण्यात त्यांनी 50 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईत समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारसोबत चर्चाही झाली होती. यावर केंद्र सरकारशी बोलून तोडगा काढण्याचं आश्वास राज्य सरकारनं दिलं होतं. मात्र, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शेतकरी सोयाबीन आणि कापसाचे दर वाढवण्याची मागणी करत आहेत.


नेमक्या काय आहेत मागण्या?


सोयाबीन आणि कापसाला खासगी बाजारात चांगला दर मिळावा, तो स्थिर रहावा, यासाठी सोयापेंड (डीओसी) निर्यातीला प्रोत्साहन द्यावं. मागील वर्षी आयात केलेल्या 5 लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी. सोयापेंड आयात करु नये. यंदा 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी. सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी. खाद्य तेल आणि इतर तेलावरील आयात शुल्क 30 टक्के करावं. कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे 11 टक्के ठेवावं. कापूस आणि सूत निर्यातील प्रोत्साहन द्यावं. तसेच सोयाबीनवरील 5 टक्के GST रद्द करावा आदी केंद्राशी संबंधित मागण्या तुपकर यांनी केल्या आहेत. 


दरम्यान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत रविकांत तुपकर यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची देखील दिल्लीत भेट घेतली होती. तसेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह माजी कृषीमंत्री शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. मात्र, अद्याप कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला नसल्याचे चित्र आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ravikant Tupkar : सोयाबीन-कापूस दरात घसरण, तुपकरांनी घेतली फडणवीसांची भेट;  दिलेला शब्द पाळा अन्यथा....