Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांची (Farmers) चांगलीच धावपळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना (Rabi Crop) बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रब्बी पिकांबरोबरच फळबाग उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर आता रब्बी पिकांचं काय होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
राज्यात कुठे झाला पाऊस
वाशिम जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाची हजेरी
वाशिम जिल्ह्यात रात्री उशिरा पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सलग दोन दिवसापासून वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं रब्बी पिकांचा धोका वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळं आधीच पीक संकटात आल्यानंतर आता अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळं खरीप पिकानंतर आता रब्बी पिकांचं काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाआहे. या अवकाळी पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
नंदूरबारमध्ये कापूस, केळीसह रब्बी पिकांना धोका
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर आणि शाहादा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.
या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील कापूस, केळी, मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात दोन दिवसापासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळं आणि ढगाळ वातावरणामुळं रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभऱ्याच्या पिकांना आळीचा धोका निर्माण झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस, कांद्यासह हरभऱ्याचे नुकसान
बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, कालपासून जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. बुलढाणा शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळं रब्बीची पीकं धोक्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, मोताळा तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील नदीला हिवाळ्यात पूर आला. तर अनेक भागात पावसाने कांदा, हरभरा पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळली आहे.
हिंगोली जिल्ह्यात पावसामुळं फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. काल हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा जवळा-पांचाळ दिग्रस या गावांच्या शिवारामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा, ज्वारी, तूर यासह अन्य फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात पावसाची हजेरी
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली. खोपोली परिसरात जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पालघर
पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं शेतकरी धास्तावले असून वीटभट्टी व्यावसायिक देखील चिंतेत आहेत. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: