Chhatrapati Sambhaji Nagar News: पिकांना योग्य भाव न मिळाल्याने बऱ्याचदा शेतकरी रस्त्यावर आपली पिके फेकताना पाहायला मिळते. तर शेतकऱ्यांच्या पिकांना भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे देखील पाहायला मिळत असते. पण याच शेतकऱ्याच्या पिकाला जेव्हा अपेक्षाप्रमाणे दर मिळते तेव्हा त्याचा आनंद काय असतो हे दाखवणारं दृश्य छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) एका गावात पाहायला मिळाले आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या आल्याला (Ginger) चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी चक्क डीजे लावून आनंद व्यक्त केला. एवढंच नाही तर डीजेच्या तालावर भन्नाट डान्स देखील केला. हा व्हिडीओ सध्या जिल्ह्यातील सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून, गंगापूर तालुक्यातील हा व्हिडीओ असल्याचं बोलले जात आहे.
गंगापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने आल्याची शेती केली. पण बाजारात याला योग्य दर मिळणार का? लावलेला खर्च तरी निघणार का? असा प्रश्न या शेतकऱ्याला पडत होता. मात्र आल्याचे पीक काढणीला आले असताना, चक्क क्विंटलला 16 हजार भाव मिळत असल्याने या शेतकऱ्याला मोठं आनंद झाला. त्यामुळे शेतातून आल्याचे पीक काढून धुण्यासाठी नेला तेव्हा या शेतकऱ्याने चक्क डीजे लावला. तर शेतकऱ्यासह शेत मजुरांनी 'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट' या गाण्यावर मनसोक्त डान्स केला. त्यामुळे आल्याला चांगला दर मिळाल्याचे आनंद यावेळी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले.
पाहा शेतकऱ्यांच्या डान्सचं व्हिडीओ
गेली चार वर्षे आले पिकाच्या दरात कायम घसरण पाहायला मिळत असून, आले पीक उत्पादक शेतकरी यामुळे मेटाकुटीला आला होता. मात्र यंदा आले पिकाच्या दरात चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे उत्पादनात झालेली घट, त्यात बाजारात वाढलेली मागणी यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक दर मिळत असल्याचे दिसून येत आहे. क्विंटलला 15 ते 16 हजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची लॉटरी लागली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल सुरू झाल्यापासून दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. तर प्रति एकर सरासरी पंधरा ते वीस गाड्यांचा उतार आल्यास, त्याची रक्कम जवळपास 10 ते 12 लाखांच्या घरात जात आहे. त्यामुळे आला शेतकऱ्यांसाठी पिवळं सोनं ठरत आहे.
गेली चार वर्षे नुकसानीचे...
यावर्षी आल्याला चांगला दर मिळाला असला तरीही, गेल्या चार ते पाच वर्षांपासून मात्र आले पिकाच्या दरात कायम घसरण पाहायला मिळत होती. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या आले पिकाला चांगला दर मिळत असल्याने, शेतकरी हतबल झाले होते. तर काही शेतकरी दरवर्षे आले पिकाचे उत्पादन करत असल्याने त्यांना या चार वर्षात मोठं नुकसान झाले. अपेक्षाप्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा होती. मात्र यंदा आले पिकाला चांगला दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: