Flower Farmers : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नासंदर्भात रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये (Nagpur) फडणवीसांची भेट घेतली आहे. प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्लास्टिक फुले (Plastic Flowers) बाजारात आल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळं प्लास्टिक फुलावर बंदी घालून, शेतकऱ्यांच्या फुलांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी रोहित पाटील यांनी केली आहे.


लवकरच संबंधित मंत्र्यांसह बैठक, फडणवीसांचे आश्वासन


सध्या राज्यातील फूल उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण फुलांच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  बाजारात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक फुले विक्रीसाठी येत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या फुलांनी मागणी कमी होत आहे. त्यामुळं सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळं प्लास्टिक फुलावर बंदी घालावी अशी मागणी रोहित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांसह बैठक लावण्यात येईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती रोहित पाटील यांनी दिली आहे. राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा असल्याचे रोहित पाटील म्हणाले.


राजू शेट्टींनी घेतली होती केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादवांची भेट


दरम्यान, देशात मोठ्या प्रमाणावर चायनीज प्लास्टिक फुलांची आयात देखील केली जाते. त्यामुळं देखील देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. सणासुदीच्या काळात जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू ,अॅस्टर, शेवंती, गॅलार्डिया इत्यादी सुट्या फुलांना व लॅडओलस, गुलाब, जरबेरा, कानेंशन, ऑर्केड्स, अॅन्थुरियम या दांड्याच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र, ही सर्व फुले चीनमधून प्लॅस्टिक स्वरूपात आयात झालेली आहेत. त्याचाच वापर केला जात आहे. याचा सर्वाधिक फटका देशातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसून बाजारात फुलांचे दर घरसत आहेत. या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांची काही दिवसांपूर्वी भेट देखील घेतली होती. चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी शेट्टींनी केली होती.  या फुलांमुळे देशातील फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे राजू शेट्टींनी म्हटले होते. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.


महत्त्वाच्या बातम्या:   


Raju Shetti : चायनीज प्लास्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घाला, राजू शेट्टी यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी