Maharashtra Seed Shortage :  ऐन खरीपाच्या तोंडावर बाजारात 'महाबीज' बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा झाला आहे. शेतकऱ्यांची 'महाबीज' सोयाबीन बियाण्यांसाठी मोठी धावाधाव होत आहे. 'महाबीज'चं यावर्षी फक्त 42 हजार क्विंटल बियाणं बाजारात आहे. 'महाबीज'चं सोयाबीन बियाणं महागल्यानंतर आता शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्यांसाठी फरफट होताना दिसत आहे. दरवर्षी राज्यभरात असते जवळपास 10 लाख क्विंटलवर सोयाबीन बियाण्याची मागणी असते. असं असताना फार कमी प्रमाणात बियाणं उपलब्ध असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काल राज्यमंत्री बच्चू कडूंनी 'महाबीज'नं मागच्या वर्षी सोयाबीन बियाण्यांत शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला होता. आजही त्यांनी यावर भाष्य केलं आहे.


गेल्या चार वर्षांत 'महाबीज'नं बाजारात पुरवठा केलेलं सोयाबीन बियाणं.


वर्ष           बियाणे(क्विंटलमध्ये) 
2019 :      5.25 लाख क्विंटल
2020 :      2.35 लाख क्विंटल
2021 :      1.53 लाख क्विंटल
2022 :      42 हजार क्विंटल


'महाबीज'नं सांगितलेली तुटवड्याची कारणं


1) मागच्या वर्षी बियाणं भरण्याच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे 'सीड प्लॉट' वाया गेलेत. त्याचा मोठा फटका बियाणे निर्मितीला बसला. 
2) त्यानंतर बरचसं बियाणं बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या तपासणीत नापास झाल्याने वाया गेलं. 
3) यातून मार्ग काढण्यासाठी उन्हाळी सोयाबीनचा पर्याय 'महाबीज'नं निवडला. परंतू, यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानाचा फटका बियाण्याला बसल्यामूळे सीड प्लॉट वाया गेलेत.


बियाणे दरवाढीवर अंकुश लावण्यात प्रत्येकच सरकार अपयशी : बच्चू कडू 


बियाणे दरवाढीवर अंकुश लावण्यात प्रत्येकच सरकार अपयशी झाली आहे. भाजपचे असो, शिवसेनेचे असो की आमचे सरकार असो. यात बियाणे कंपन्यांची एकप्रकारे मक्तेदारी झाली आहे. यातला झारीतला शुक्राचार्य कोण? याचा शोध घेतला पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केल्याने एकप्रकारे सरकारला घरचा आहेर दिला आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. अशातच महाबीजने जे सोयाबीनचे भाव वाढवले आहेत त्याची काही गरज नाही, कंपनी पेक्षा शेतकरी पारंपारिक पद्धतीने चांगले बियाणे तयार करतो. महाबीजने कित्येकदा बाजारातून सोयाबीन खरेदी केले आणि पॅकेट मध्ये भरून विकले याची उदाहरणे आहेत. याच फसवेगिरीला आळा बसावा यासाठी उपाय म्हणून मी बियाणे महोत्सव अमरावती आणि अकोला जिल्ह्यात सुरू केला आहे. मार्केट मध्ये जे बियाणं 150 ते 200 रुपये किलो मिळते ते शेतकऱयांनी काल अर्ध्या किमतीत खरेदी केले. अकोला येथील महोत्सवात 900 क्विंटल बियाण्यांची विक्री झाली, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. 


अकोला जिल्हा हा लहान जिल्हा आहे. तरी आशा महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे किमान 20 कोटी रुपये वाचू शकतात. राज्याच्या संपूर्ण 36 जिल्ह्यात हा उपक्रम राबविला तर हा आकडा अब्जावधी मध्ये असेल जो पैसा थेट शेतकऱ्याला मिळेल. कुठलीच कंपनी बियाणे निर्मितीचे निकष तंतोतंत पालन करत नाही, कंपन्यांवर बॅन घातला पाहिजे आणि फक्त शेतकरी बियाणे विकेल अशी व्यवस्था तयार झाली पाहिजे असं ही बच्चू कडू म्हणाले.