Kisanputra Andolanon : शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या (Kisanputra Andolanon) वतीनं दरवर्षी 19 मार्चला उपोषण करण्यात येते. यावर्षी देखील 19 मार्चला सर्वांनी शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करण्याचं आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब (Amar Habib) यांनी केलं आहे. शेतकऱ्यांसाठी आपण काही करू शकतो का? याचा विचार करून हा एक दिवस उपवास करण्याचे ठरवले आहे. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न करु असे हबीब यांनी म्हटलं आहे. यावर्षी किनगाव (जळगाव) ते धुळे अशी पदयात्रा निघणार आहे.


शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे येत आहेत. याही वर्षी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. जे आत्महत्या करतात त्यांचे आकडे येतात पण जे 'मरण' जगतात त्यांचे काय? विधानसभा आणि लोकसभेची अधिवेशने झाली. त्यात कोणी साधे दुःख व्यक्त केले नाही. राजकीय स्तरावर क्रूर कोडगेपणा पसरला आहे. अशा परिस्थितीतून देश जात आहे. आपण काही करु शकतो का? याचा विचार करुन आम्ही ठरवले आहे. 19 मार्च रोजी आपण सगळे शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करु असे अमर हबीब यांनी म्हटलं आहे. 


19 मार्च का?


19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता.महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी, पत्नी आणि चार मुलांसह आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. 2017 पासून महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील आणि विदेशातील लाखो सहृदयी लोक दरवर्षी 19 मार्चला उपवास करतात. या वर्षी आपण त्यात सहभागी होऊ या.


शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकत्र येऊया


अन्न हा जीवाचा मूलाधार आहे. अन्न निर्माण करता आले म्हणून माणूस प्रगती करु शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरेतर शेतकरी आत्महत्या ही 'राष्ट्रीय आपत्ती' मानली पाहिजे. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी मी काय करु शकतो? आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू आदी) नरभक्षी कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही. आपण शस्त्र घेऊन लढू शकत नाही. करोडो शेतकाऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवढी पुंजीही आपल्याजवळ नाही. आपण सामान्य माणसे, सहवेदना व्यक्त करु शकतो. शेतकऱ्यांना 'आम्ही तुमच्या पाठिशी आहोत' हा दिलासा देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी आणि सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्च रोजी आपल्याला उपवास करायचा आहे. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न आपण करायचा आहे!


उपवास आणि उपोषण


हा उपवास उत्स्फूर्तपणे, आपल्या मनाशी निर्धार करुन करायचा आहे. आपण आपले नित्याचे काम करत उपवास करु शकतो. खूप केले देवा-नवसाची उपवास, आता एक उपवास शेतकऱ्यांसाठी याला आपण वैयक्तिक उपवास म्हणू. सार्वजनिक ठिकाणी बसणे, म्हणजे उपोषण करणे, तुम्हाला जे सोयीचे वाटेल त्या पद्धतीने उपवास किंवा उपोषण करु शकता.


अन्नत्याग का?


1) साहेबराव करपे कुटुंबीय आणि आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांचे स्मरण करणे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
2) शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणे. 
3) शेतकऱ्यांप्रती आपली बांधीलकी बळकट करणे.
4)  शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा विचार करुन ते कारण दूर करण्याचा प्रयत्न करणे.
5)  शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्प करणे.


19 मार्चचा उपवास


पहिल्या वर्षी (2017) साहेबराव करपे यांचे गाव चिल-गव्हाण (यवतमाळ) येथे उपवास सुरु करुन महागाव येथे उपोषणाला बसलो. या वर्षी लाखो लोकांनी देश-विदेशात वैयक्तिक उपवास केला. दुसऱ्या वर्षी (2018) साहेबराव करपे कुटुंबीयांनी जेथे आत्महत्या केली, त्या दत्तपुरला (जि. वर्धा) भेट देऊन पवनार येथे उपोषण केले. तिसऱ्या वर्षी (2019) दिल्लीत म. गांधी समाधी (राजघाट) परिसरात उपवास केला. चौथ्या वर्षी (2020) मी आणि माझ्या अनेक किसानपुत्र मित्रांनी पुण्यात उपवास केला. सहाव्या वर्षी (2021) पहिली पदयात्रा निघाली. औंढा ते चिलगव्हाण. चिलगव्हाण येथे मशाल पेटवून उपवासाची सांगता करण्यात आली. सहाव्या वर्षी (2022) आंबाजोगाई (जि बीड) येथे सामूहिक उपवास केला. या वर्षी पानगाव ते आंबाजोगाई अशी पदयात्रा काढण्यात आली.


उपोषणाचे सातवे वर्ष 


यावर्षी (वर्ष 7 वे 2023) खान्देशातील धुळे येथे उपोषण करणार आहोत. किनगाव (जळगाव) ते धुळे अशी पदयात्रा निघणार आहे. अमरावती जिल्ह्यातही पदयात्रा निघणार आहे. महाराष्ट्रातील लाखो स्त्री पुरुष दरवर्षी 19 मार्चला उपवास करतात. अनेक जिल्ह्यातील कित्येक गावात सामूहिक उपवास केला जातो. देशात विविध राज्यातील किसानपुत्र वैयक्तिक उपवास करतात. विदेशात गेलेले किसानपुत्र देखील उपवास करतात.


शिस्त-


1)  हे उपोषण कोण्या एका संघटनेचे किंवा कोण्या एका राजकीय पक्षाचे नाही. ज्यांना शेतकाऱ्याबद्दल बांधिलकी वाटते, त्या सर्वानी एकत्र येऊन करणे चांगले. अशा स्थितीत आपले सर्व अभिनिवेश बाजूला ठेवावे.
2)  एकत्र न येताही आपण आपल्या बॅनर खाली उपोषण करू शकता. एवढेच नव्हे तर एकट्याने सुद्धा उपवास करु शकता. उपवास करायला कोणावरही बंदी नाही.
3) या उपोषणाच्या निमित्ताने कोणताही वाद उपस्थित होणार नाही याची काळजी घ्यावी. 
एका अत्यंत गंभीर विषयावरील हे उपोषण होत आहे, त्याचे तेवढे गांभीर्य कायम ठेवावे.


विशेष सूचना-


1) हे उपोषण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करता येईल. 
सार्वजनिक उपोषण 10 ते 5 या वेळेतही करता येईल.
2) डायबेटीज किंवा अन्य रुग्ण वा वृद्ध व्यक्तीने आपल्याला झेपेल एवढ्याच वेळेपुरते उपोषण करावे.
3) विद्यार्थ्यांनी व लहान मुलांनी दोन मिनिटे मौन पाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱयांचे स्मरण करावे.


शेतकाऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होत आल्या आहेत. दरवर्षी हजारो आत्महत्या होत आहेत. खरेतर, या सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या हत्या असल्याचे अमर हबीब म्हणाले. आपल्या अवतीभोवती वणवा पेटला आहे. तो विझवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. सर्जकांना स्वतंत्रपणे सुखाने व सन्मानाने जगता यावे यासाठी ही धडपड आहे. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने त्यात सहभागी व्हावे! ही काळाची गरज आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Amar Habib : इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो, 'मृदगंध' साहित्य संमेलनात अमिर हबीब यांनी केलेलं भाषण