Maharashtra Amravti News : मेंढपाळ धनगर विकास मंचाचे अध्यक्ष संतोष महात्मे यांनी मेंढपाळांना पशुधनविमा योजना सुरू करण्याबाबत केलेल्या मागणीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. मेंढपाळांचा मेंढी चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. तसेच मेंढपाळांना पशुधनविमा योजना सुरू करणं, तसेच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक योजना या समाजासाठी राबविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाहीही वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती.
मंत्रालयातील दालनात नुकतीच मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांबाबत एक बैठक झाली. या बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासचे सहसचिव माणिक गुट्टे, अवर सचिव विकास कदम, उपायुक्त डॉ.शैलेशे पेठे, मेंढपाळ धनगर विकास मंच महाराष्ट्राचे संस्थापक संतोष महात्मे यांच्यासह अनेकजण या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "मेंढपाळ आणि वन विभागाच्या संघर्षाची तक्रारी वारंवार येत आहे. हे लक्षात घेता वन विभागाकडून मेंढपाळांवर वन क्षेत्रात मेंढपाळानी चराई करण्याकरिता शासनाच्या आदेशान्वये बंदी आहे. तरी शासनाकडून बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त मेंढी पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणं, कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करणाऱ्या मेंढपाळाना शेडचं बांधकाम आणि मोकळ्या जागी पिण्याचं पाणी, चारा बियाणं, बहुवार्षिक गवत प्रजातीचं बियाणं उपलब्ध करून देण्याबाबत योजना प्रस्तावित कराव्यात, अशा सूचना यावेळी राज्यमंत्री यांनी बैठकीत दिल्या आहेत. मेंढपाळ धनगर विकास मंच महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी मेंढपाळांचे विविध प्रश्न यावेळी बैठकीत मांडले.
मेंढपाळांना देण्यात येणाऱ्या पशुधन विम्याचं कार्यक्षेत्र वाढवणार
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "मेंढपाळांना देण्यात येणाऱ्या पशुधनविमा योजनांचे कार्यक्षेत्र वाढविण्याबाबत वरिष्ठ स्तरावर याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येईल. शासनाकडून मेंढपाळांसाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहिती व्हावी यासाठी लवकरच विभागस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी 100 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या राज्यात 73 तालुक्यांत फिरतं पशू चिकीत्सालयं आहेत. लवकरच 80 तालुक्यात ही सुविधा वाढविण्याचा शासनाचा विचार आहे. फिरत्या पशू चिकीत्सालया करिता 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे. त्याचा लाभ मेंढीपाळांनी घ्यावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मेंढपाळांना मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन मेंढपाळांकडून आलेल्या सूचनांवर नक्कीच कार्यवाही करेल, अशी ग्वाही यावेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिली आहे.