Sugarcane Season : यावर्षीचा म्हणजे 2022-23 चा ऊसाचा गळीत हंगाम (Sugarcane Season 2022-23) अंतिम टप्प्यात आला आहे. तर काही ठिकाणी हंगामाची सांगता झाली आहे. यावर्षीचा साखर हंगाम नेमका कसा राहिला? साखर आणि इथेनॉलचे किती उत्पादन झाले. गळीत हंगामाची वैशिष्ट्य काय? यासह विविध मुद्यांवर राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी माहिती दिली आहे. त्यांनी 2022-23 च्या ऊसाच्या गळीत हंगामासंदर्भात एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले.


आत्तापर्यंत 104 लाख टन साखरेचं उत्पादन, इथेनॉलच्या उत्पादनातही वाढ 


आज घडीला राज्यातील 210 साखर कारखान्यांपैकी 155 च्या आसपास साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. 55 कारखाने सध्या सुरु आहेत. सध्या आपण हंगामाच्या अंतिम टप्प्यात आहोत. 2022-23 च्या ऊसाच्या गळीत हंगामात आत्तापर्यंत 105 लाख टन साखर तयार झाली असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. तर 1042 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा वेग खूप जास्त आहे. दरम्यान, मागील वर्षी 15 जूनपर्यंत साखर कारखाने चालले यावर्षी मात्र, तशी परिस्थिती नसल्याचे गायकवाड म्हणाले. मागील वर्षी शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस देण्यासाठी बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र, यावर्षी तशी परिस्थिती नसल्याचे गायकवाड म्हणाले. दरम्यान, यावर्षी इथेनॉलच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. 130 कोटी लीटरच्या पुढे इथेनॉलचे उत्पादन होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड म्हणाले. 


 



यावर्षी ऊस गळीत हंगामाची वैशिष्ट्य काय?


1) इतिहासात प्रथमच राज्यातील 210 साखर कारखान्यांनी यंदा ऊसाचं गाळप केलं. आत्तापर्यंत कधीच  एवढ्या जास्त साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप केलं नव्हतं. 


2) बंद पडलेले 24 साखर कारखाने यंदा सुरु करण्यात यश आलं, त्यामुळं यावर्षी गाळपाचा वेग खूप जास्त राहिला.


3) दररोजची गाळप क्षमता दीड लाख टनांनी वाढली आहे. अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळं इथून पुढे 15 एप्रिलच्या नंतर साखर कारखाने चालण्याची शक्यता कमी आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.   


4) मागील वर्षी 110 कोटी लीटर इथेनॉलचे उत्पादन झाले होते. यावर्षी इथेनॉलचे 130 कोटी लीटरच्या पुढे उत्पादन होण्याची शक्यता आहे.


यावर्षी साखरेच्या उत्पादनात घट का झाली?


यावर्षी 30 टक्के खोडवा होता. त्यामध्ये 30 ते 40 टक्क्यांची घट आली आहे. जास्त घट ही मराठवाड्यात आली असल्याचे शेखर गायकवाड म्हणाले. मागील वर्षी जूनपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सतत पाऊस झाला. त्यामुळं ऊसाची वाढ झाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या उत्पादनातही घट झाली आहे. जिथे 40 ते 45 कांड्यावर ऊस जातो. तिथे यावर्षी 20 कांड्यावर ऊस राहिला. यामुळं ऊसाच्या उत्पादनात 30 टक्क्यांच्या आसपास घट झाल्याचे गायकवाड म्हणाले. आत्तापर्यंत एकूण गाळप हे 1045 लाख टन झाले आहे. मागील वर्षी 12 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात आली होती. यावर्षी 16 लाख टन साखर ही इथेनॉलकडे वळवण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु झाला होता. तर यावर्षी 14.87 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र होतं. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sugarcane Production : 2021-22 चा साखर हंगाम समृद्ध, ऊस उत्पादनासह साखर निर्यातीत विक्रम; वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर