Onion News : सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण झाली असून, कांद्याची कवडीमोल दरानं विक्री होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका भसत आहे. दरम्यान, कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांना 350 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. हे अनुदान मिळण्याची आज (31 मार्च) शेवटची तारीख आहे. त्यामुळं नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव, नांदगाव, मनमाड बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे. कारण जे शेतकरी आज कांद्याची विक्री करतील त्यांनांच अनुदान मिळणार आहे. 


कांद्याला प्रतिक्विंटल 400 ते 500 रुपयांचा दर 


नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आहे. याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर होताना दिसत आहे. कांद्याच्या दरात घसरण होऊ नये अशी शेतकऱ्याची मागणी आहे. मात्र, वाढत्या आवकेचा परिणाम दरांवर होतोय. मागील काही आठवड्यांपासून कांद्याला सरासरी 400 ते 500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, आज कांद्याच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लाल कांद्याला प्रती क्विंटल 400 ते 600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल 500 ते 700 रुपयां भाव मिळत आहे.


1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या काळासाठीच हे अनुदान


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत दिलं जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) कांदा विक्री केला त्याच ठिकाणी अर्ज करावा लागत आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या काळासाठीच हे अनुदान मिळणार आहे. त्यामुळं आजचा शेवटचा दिवस आहे. हे अनुदान पुढच्या 30 दिवसात हे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. 


शेतकऱ्यांसह विरोधी पक्षानं केली होती अनुदानाची मागणी


लेट खरीप कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. या मुद्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्या, अशा प्रकारची मागणी विरोधकांनी केली होती. विधानभवनाच्या पायऱ्यांपासून सभागृहात विरोधकांनी या मागणीसाठी आंदोलन करत सभात्यागही केला होता. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 300 रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारनं केली होती. पण विरोधकांनी 500 रुपये प्रतिक्विंटल मदतीची मागणी लावून धरली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला होता. शेतकरी आणि विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळं कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


Onion News : कांदा अनुदानाला 200 क्विंटलची मर्यादा, 30 दिवसात अनुदान वाटप करण्याचे आदेश