Onion Price : कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर 450 ते 600 रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) हवालदिल झाले आहेत. त्यामुळं याबाबत राज्यातील भाजप-शिंदे सरकारनं (BJP-Shinde Govt) तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं करण्यात आली आहे. सरकारने कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी हस्तक्षेप न केल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या दारात कांदे ओतण्याचे आंदोलन किसान सभा हातात घेईल, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Dr. Ajit Nawale) दिलाय. सत्ताधाऱ्यांनी सत्ताखेळ थांबवावा आणि कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे. 


सरकारनं शेतकऱ्यांची उपेक्षा थांबवावी


सरकारनं शेतकऱ्यांची ही संतापजनक उपेक्षा थांबवावी, कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी अशी मागणी किसन सभेचे नेते अजित नवलेंनी केलीय. राज्यातील प्रमुख कांदा बाजार समित्यांमधील विक्रीदर 450 ते 600 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च 850 ते 900 रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र, राज्यात आजमितीला कांद्याला प्रतिक्विंटल केवळ 450 रुपये ते 600 रुपयांचा दर मिळत असल्याचे अजित नवले म्हणाले.


सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही


कांद्याचा उत्पादन खर्च तर सोडाच या दरात काढणी आणि  वाहतुकीचा दरही भरून निघत नाही. राज्यातील भाजप-शिंदे सरकारनं या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने सरकार आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष सत्तेच्या साठमारीत मशगुल आहेत. कोणत्या पक्षाला कोणते चिन्ह मिळाले, कोणाचे आमदार अपात्र झाले, कोणाचे सरकार टिकणार यातच सत्ताधारी पक्षांनी महाराष्ट्राला गुंतवून टाकले आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्याचे अजित नवले म्हणाले. सरकारनं शेतकऱ्यांची ही संतापजनक उपेक्षा थांबवावी आणि कांदा उत्पादकांना  तातडीने मदत करावी अशी मागणी किसन सभा करत आहे. 


... तर आरपारचा संघर्ष करावा लागेल


प्रमुख कांद्याच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर घसरले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, मनमाड, चांदवड आणि नांदगाव या बाजरपेठांचा समावेश आहे. या बाजारपेठांमध्ये कांद्याला 450 ते 600 रुपयापर्यंतचा दर मिळत असल्याचे अजित नवले म्हणाले. यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळं सरकारनं कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं, निर्यात अनुदान द्यावे, ज्या कांदा उत्पादकांवर संकट आले त्याचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांच्या खात्यात 600 रुपयांचे अुदान जमा करावे अशी मागणी अजित नवलेंनी केली आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर किसान सभा आरपारचा संघर्ष करेल असा इशारा अजित नवलेंनी दिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nashik News : 'मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र', नाशिकच्या शेतकऱ्याचा कांदा अग्निडाग समारंभ