मुंबई : केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात "साथी" प्रणालीच्या क्यु आर कोड सह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहे. या क्यु आर कोड सह दर्जेदार वाणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींना आवाहन केले आहे. हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा.
येत्या खरीप हंगामात महाबीज चे सर्व प्रमाणित बियाणे हे साथी पोर्टल मधून नोंदणी केलेले असणार आहे व बियाण्याच्या प्रत्येक बॅग वर साथी पोर्टलचा क्यू आर कोड असणार आहे. हा कोड स्कॅन केल्यावर या बियाण्यासाठी वापरलेल स्त्रोत बियाणे कोठून मिळाले, या बियाण्याचे उत्पादन व प्रक्रिया कुठे झाली आहे, बियाण्याच्या तपासणीचे लॅब रिपोर्ट अशी इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. म्हणजेच हे बियाणे 100% शुद्ध असल्याची एक प्रकारे खात्रीच शेतकऱ्यांना मिळणार आहे.
राज्यस्तरीय खरीप 2025 हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बियाणे शोध क्षमते (treaceability) करिता केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या साथी पोर्टलचे महत्व अधोरेखित केले असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल असे सांगितले आहे.
खरीप 2025 हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळेत बियाणे पुरवठा करण्याकरिता महाबीजने चोख नियोजन केले आहे. यंदा मान्सुन लवकर येण्याची चिन्हे असल्याची पार्श्वभुमी लक्षात घेऊन. बियाणे पुरवठयाचे कार्य सुरू झाले आहे. काही वाणांच्या बियाणेची अतिरिक्त मागणी झाल्यास ते सुध्दा बियाणे उपलब्ध करून देण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत.
महाबीज मार्फत एकूण अडीच लाख क्विंटल बियाणे बाजारात पुरवठा करण्यात येत आहे. यापैकी 71000 क्विंटल बियाण्याची मात्र ही विद्यापीठांद्वारे नव्याने संशोधन केलेल्या वाणांची असणार आहे.
याशिवाय राज्य बियाणे महामंडळ म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांमध्ये देखील महाबीज बियाणे पुरवठा करते. या वर्षी सुद्धा राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत विविध पिकातील नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दरांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात तूर रु. 130 प्रति किलो, मूग दर रु. 140 प्रति किलो, उडीद दर रु. 135, धान (भात) वाणांनुसार रु. 30 ते 40 प्रति किलो, संकरीत बाजरा दर रु 150 प्रति किलो, सुधारित बाजरा दर रु 70 प्रति किलो, नाचणी दर रु. 100 प्रति किलो या अनुदानित दरात उपलब्ध होणार आहे.
याशिवाय पूर्वीची ग्राम बीजोत्पादन योजना आता राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा बियाणे घटक या नावाने येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध होणार आहे. मागील वर्षी पर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 1 एकर क्षेत्राच्या मर्यादेतच बियाणे मिळत होते. परंतु यावर्षी ही मर्यादा 2.5 एकर पर्यंत वाढविण्यात आली आहे.
याशिवाय राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत सोयाबीन पिकासाठी सुवर्णा सोया, फुले दुर्वा, पी.डी.के.व्ही अंबा, एन.आर.सी-130, फुले किमया, MACS-1460, MACS-725 या वाणाचे बियाणे 100% अनुदानावर उपलब्ध होत आहेत. सदर योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा लागेल.
वरील सर्व बियाण्याची माहिती देणे तसेच विक्री करण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्याच्या हेतूने महाबीजने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अधिकृत विक्रेत्यांच्या सभा घेतल्या व विक्रेत्यांना बियाणे विक्री साठी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
याशिवाय शेतकऱ्यांना बियाणे बाबत माहिती देण्यासाठी गावस्तरावर शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. यात नवनवीन वाणांची व जैविक खते व बुरशीनाशकची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. याव्यतिरीक्त सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता महाबीजने स्वतः चे यूट्यूब चॅनल, महाबीज वार्ता सुरू केले असून यात राज्यभरातील शेतकऱ्यांचे नवनविन वाणांबद्दलचे अनुभव, शेती विषयक महत्वपूर्ण माहिती व तांत्रिक बाबींबद्दल मोठ्या प्रमाणात व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहेत. youtube.com/@mahabeejvarta या लिंकवर जाऊन दर्जेदार वाणांची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींना आवाहन करण्यात आले आहे.
दि. 28 एप्रिल 2025 रोजी महाबीजने 49 वर्ष पूर्ण करून 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. चोख नियोजन, रास्त दर, उच्च गुणवत्तापूर्ण बियाणे यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गेल्या अर्धशतकाचा वारसा महामंडळ जबाबदारीने पुढे नेत आहे.