Jarann Official Trailer : सध्या थिएटर आणि बॉक्स ऑफिसवर हॉरर चित्रपटांची जादू पाहायला मिळत आहे. विशेषतः हॉरर कॉमेडी चित्रपट रसिकांची मने जिंकत आहेत. अशा वेळी एक मराठी चित्रपट हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरीखुरी वाटणारी स्टोरी, थरकाप उडवणारा आणि मानसिक पातळीवर हादरवणाऱ्या ‘जारण’ या चित्रपटांचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटाच्या ट्रेलरमधील अभिनेत्री अमृता सुभाष मुख्य भूमिकेत असून, तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातलीये.
हा चित्रपट मराठी लोककथा आणि अंधश्रद्धांच्या जगात शिरतो आणि काळ्या जादूचा अंगावर शहारे आणणारा संदर्भ घेतो. जर हे विषय व्यवस्थित हाताळले गेले, तर नक्कीच हा सिनेमा कौतुकास पात्र ठरू शकतात. अलीकडेच गुजराती चित्रपट वश आणि त्याचा हिंदी रिमेक शैतान यांनी हाच विषय यशस्वीपणे हाताळला. आणि आता जारण देखील त्याच मार्गाने पुढे जाण्यास सज्ज आहे!
'आहट'च्या काळात परत?
ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून थरार निर्माण होतो आणि हा अस्वस्थ करणारा प्रवास काळोख्या, अस्सल पण भुरळ घालणाऱ्या दृश्यांद्वारे सुरु होतो. एका टाकून दिलेल्या सॉफ्ट टॉयपासून सुरू होणारी ही कथा ‘आहट’च्या एखाद्या भयावह भागाची आठवण करून देते.
'भूलभुलैय्या'च्या गुंत्यात 'जारण'?
विशेष म्हणजे, जारण या ट्रेलरमध्ये भूलभुलैय्यासारखा ट्विस्ट वापरण्यात आलाय, जिथे हे खरंच हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर – हे निश्चित करता येत नाही! आणि हाच ट्रेलरचा सर्वात मोठा विजय ठरतो! मात्र, ‘जारण’ ही कथा विद्या बालनच्या ‘मंजुलिका’पेक्षाही अधिक खोलवर जाऊन मानसिकतेवर प्रहार करते!
ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये अमृता सुभाष तिचा सर्वोत्तम अभिनय सादर करते आणि त्यामुळे हा चित्रपट यशस्वी होण्याचा सुरक्षित पर्याय वाटतो. तिच्यासोबत अनीता दाते केळकर, किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारही महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. हा भयपट येत्या 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या