Lumpy Skin Disease : जनावरांवर लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव वाढत असल्यानं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात लम्पी स्कीन प्रादुर्भाव झाला आहे. लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. राज्यातील 12 जिल्ह्यातील 102 गावांमध्ये याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. या बाधित गावातील 997 पशुधनापैकी एकूण 628 पशुधन उपचाराने बरे झाले आहे.
1 लाख 57 हजार 696 पशुधनास लसीकरण
राज्यात प्रथम जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावात 4 ऑगस्टला लम्पी स्कीन रोगाची लागण झालेली जनावरे आढळून आली होती. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला. सध्या राज्यातील अहमदनगर, अकोला, सातारा, बुलडाणा, उस्मानाबाद, अमरावती, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या 12 जिल्ह्यात लम्मी स्कीन आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव झाला आहे. 102 गावातील जनावरांवर याचा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान, बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिघातील 492 गावातील एकूण 1 लाख 57 हजार 696 पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावातील एकूण 997 बाधित पशुधनापैकी 628 पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यात 10, अहमदनगर जिल्ह्यात एक तर पुणे जिल्ह्यात दोन अशा एकूण बाधित 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण
राज्यातील पशुपालकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. कारण जनावरांवर लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जनावरांवर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून बीड आणि अहदनगरच्या जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
बीड जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं तेथील पशुपालक चिंतेत आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव वाडू नये म्हणून जिल्हा प्रशासनं सतर्क झालं आहे. जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरुर कासार आणि पाटोदा या तालुक्यातील जनावरांचे बाजार पुढचे काही काळ बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. बीड जिल्ह्यातल्या धसवाडी येथे काही जनावरांमध्ये लंपी स्कीन आजार आढळून आल्याने जिल्हाभरातील इतर जनावरांना त्याची लागण होऊ नये म्हणून अंबाजोगाई, परळी, आष्टी आणि शिरुर तालुक्यासह पाटोदा येथील जनावरांचे बाजार भरवण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. यापूर्वी देखील या आजाराचा संसर्ग अनेक जनावरांना झाला होता. त्यामुळं हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याधिकाऱ्यांनी देखील जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश
- Lumpy Virus : महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचे थैमान, आजाराची लक्षणे काय? काळजी काय घ्यावी?