Kisan sabha : शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध मागण्यांसाठी किसान सभेचे (Kisan Sabha) राज्यभर धरणे आंदोलन सुरु आहे. 23 नोव्हंबर  राज्याच्या विविध भागात किसान सभेच्या वतीनं हे आंदोलन सुरु आहे. किसान सभेच्या अकोले इथं झालेल्या राज्य अधिवेशनात 23 मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले होते. या मागण्यांची सरकारनं दखल न घेतल्यामुळं 23 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना रास्त हमी भाव देणारा केंद्रीय कायदा करावा तसेच प्रस्तावित केंद्रीय वीज विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी उद्या (26 नोव्हेंबर)  देशभर राज्यपाल भवनांवर मोर्चे आयोजित करण्याची हाक देण्यात आली आहे. उद्या राज्यपालांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात येणार आहे.


नेमक्या काय आहेत मागण्या?


राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये अर्थसहाय्य द्यावं
गायरान जमिनी ताबेदारांच्या नावे कराव्या
वनजमिनी, देवस्थान जमिनी कसणारांच्या नावे करा
कर्जमाफी योजनांची अपुरी अंमलबजावणी पूर्ण करा


उद्या तीव्र आंदोलन करण्याचे नियोजन 


या मामागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने 23 नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तहसील कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलने सुरू केले आहे. 26 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील तहसील कार्यालयांवर मोर्चे काढून आंदोलन तीव्र करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  किसान सभेच्या अकोले राज्य अधिवेशनाने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, पीक विमा कंपन्यांनी बाधित शेतकऱ्यांना अग्रिम व अंतिम भरपाई विनाविलंब द्यावी यासह 23 मागण्यांचे ठराव संमत केले होते. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास 23 नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. यानुसार राज्यभर आंदोलने सुरू करण्यात आली आहेत.


या जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी 


ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, अमरावती, वर्धा, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत आचार संहितेचे कारण पुढे करून प्रशासनाने आंदोलनास परवानगी नाकारली आहे. तरी या जिल्ह्यांमध्ये 26 नोव्हेंबरला  शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाबरोबर विस्तारीत बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने अधिक अंत न पाहता शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात येत आहे.  
शेतकऱ्यांना रास्त हमी भाव देणारा केंद्रीय कायदा करावा व प्रस्तावित केंद्रीय वीज विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी 26 नोव्हेंबर रोजी देशभर राज्यपाल भवनांवर मोर्चे आयोजित करण्याची हाक दिली होती. राज्याच्या स्थानिक मागण्या जोडून घेत किसान सभेने संयुक्त किसान मोर्चाच्या या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत समविचारी संघटनांना सोबत घेत संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने उद्या राज्यपालांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : मिरजेसह चार तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना धोका, हरभरा उत्पादकही चिंतेत