Ajit Nawale on Onion : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर कांदा (Onion) उत्पादकांमधील रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी (Onion Export Ban) उठवण्याची घोषणा केलीय. मात्र, प्रत्यक्षात अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. सरकारने कांद्याची निर्यात होणार नाही अशाप्रकारे डावपेच करण्यात आल्याची टीका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Ajit Nawale) केलीय. सरकारनं निर्णय घेताना घातलेल्या अटी शर्तीमुळं शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचे अजित नवले म्हणाले.
नेमके डावपेच काय?
कांद्याच्या निर्यातीसाठी प्रति टन 550 डॉलर किमान निर्यात मूल्य आणि 40 टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे. यामुळं भारतीय कांदा निर्यात करताना त्याचे शुल्क 64 रुपये प्रति किलो पर्यंत जाणार आहे. निर्यातीचा खर्च पाहता संबंधित देशात भारतीय कांदा पोहचेल तेव्हा त्याची किंमत 70 ते 75 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचणार आहे. संबंधित देशात 30 रुपये ते 50 रुपये प्रति किलोप्रमाणे कांदा उपलब्ध आहे. त्यामुळं 70 ते 75 रुपये प्रतिकिलो किमतीचा भारतीय कांदा तेथे कुणी घेणार नाही. परिणामी निर्यातबंदी उठवली असली तरी प्रत्यक्षात कांद्याची निर्यात होणार नाही असे अजित नवले म्हणाले.
सरकारनं कांद्याची निर्यातबंदी पूर्णपणे उठवून विनाअट निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावं
केंद्र सरकारचा अटी शर्तींचा हा खेळ शेतकरी विरोधी असल्याचे अजित नवले म्हणाले. एकीकडे दिल्यासारखं करायचं दुसरीकडे मात्र अटी शर्ती लागू करुन शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही यासाठी डावपेच करायचे, अशा प्रकारची कृती केंद्र सरकारने केली असल्याचे मत अजित नवलेंनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकारने अटी शर्तींचे हे डावपेच थांबवावेत व कांद्याची निर्यात बंदी संपूर्णपणे उठवून विनाअट कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे अशी मागणी किसान सभेच्या वतीने अजित नवले यांनी केली आहे.
शेतकरी संघटना आक्रमक
केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतलाय. डिसेंबर 2023 मध्ये सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी मार्च 2024 पर्यंत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, जोपर्यंत सरकार पुढील आदेश देत नाही तोपर्यंत बंदी उठणार नाही असं सरकारच्या वतीनं मार्चमध्ये सांगण्यात आलं होतं. अखेर आज कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठली आहे. मात्र, सरकारनं कांदा निर्यातीसाठी प्रति टन 550 डॉलर किमान निर्यात मूल्य आकारले आहे. त्यामुळं शेतकरी संघटटना आक्रमक झाल्या आहेत. विना अटी आणि शर्तीसह कांदा निर्यात सुरु करावी अशी मागणी त्यांनी केलीय.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, पण मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क लागू, शेतकऱ्यांना फायदा होणार का?