जळगाव: एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा बसल्याने जळगावातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे जळगावातील रावेर तालुक्यातील शेकडो एकर केळीच्या बागाचे नुकसान झालं आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी पट्टा असलेल्या रावेर तालुक्यात पुन्हा वादळी पावसाचा तडाखा बसल्याने केळी पिकांचं कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यातही रावेर तालुक्यातील काही भागात मोठं नुकसान झालं असताना काल रात्री पुन्हा वादळी पावसाचा तडखा बसून नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संकटांच्या मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाही. केळी पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रावेर तालुक्यात गेल्या काही वर्षात मे आणि जूनमध्ये चक्री वादळ होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. अशाच घटनेत मागील आठवड्यात अहिरवाडी भागात मोठ नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच, काल रात्रीच्या वेळेस रावेर तालुक्यातील सावखेडा, खिरोदा, धामोडी, कांडवेल भागात जोरदार वादळी पाऊस झाला. त्यामुळे या भागातील शेकडो एकरवर असलेले केळी पीक जमीनदोस्त झालं आहे.
मागील वर्षी देखील नुकसान झालेल्या पिकांची अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. जर मदत मिळणारच नसेल तर पंचनामेही करू नका अस संतप्त सवालही शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
हिंगोलीतही नुकसान
बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा यासह दहा ते बारा गावाच्या शेत शिवारातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण या भागातील केळी हे पीक प्रमुख पीक मानले जाते. कालच्या वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे आणि कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. पाचशे हेक्टर शेतजमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. या शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याची माहिती वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली आहे.