Assam Floods : देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे पाऊस पडत आहे तर कुठे उन्हाचा चटका जावत आहे. अशातच आसाममध्ये (Assam) मात्र मुसळधार पाऊस सुरु आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं तेथील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पूरस्थितीमुळं आसाममधील अनेक भागात गावं, शहरांसह शेती पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. 30 हजार लोकांना या पूरस्थितीचा फटका बसला आहे. आसाममधील 142 गावे पाण्याखाली आहेत. तर 1 हजार 510.98 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालं आहे.


या भागात मुसळधार पावसाचा इशारा


आसाममधील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका तेथील नागरिकांना बसला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आसामसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. गुरुवारपर्यंत (22 जून) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. IMD च्या गुवाहाटी येथील प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) कोकराझार, चिरांग, बक्सा, बारपेटा आणि बोंगाईगाव जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाच्या अंदाजासह 'रेड' अलर्ट जारी केला आहे. याच कालावधीत धुबरी, कामरूप, कामरूप महानगर, नलबारी, दिमा हासाओ, कछार, गोलपारा आणि करीमगंज जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


142 गावे पाण्याखाली 


दरम्यान, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या दैनंदिन पूर अहवालानुसार, कचार, दररंग, धेमाजी, दिब्रुगड, गोलाघाट, होजई, लखीमपूर, नागाव, नलबारी, सोनितपूर, तिनसुकिया आणि उदलगुरी येथे पुरामुळं 33,400 हून अधिक लोकांना फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये 16 मदत वितरण केंद्रे चालवण्याव्यतिरिक्त, प्रशासन एक मदत शिबिर चालवत आहे. जिथे नऊ लोकांनी आश्रय घेतला आहे. ASDMA ने दिलेल्या माहितीनुसार सध्या 142 गावे पाण्याखाली आहेत. तर आसाममधील 1,510.98 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.


 मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना


दिमा हासाओ आणि करीमगंजमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्याचवेळी सोनितपूर, लखीमपूर, उदलगुरी, चिरांग, दिब्रुगढ, कामरूप, कार्बी आंगलाँग, करीमगंज, बोंगाईगाव, माजुली, मोरीगाव, शिवसागर आणि दक्षिण सलमारा येथे बंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. नेमातीघाट येथील ब्रह्मपुत्रा, एनएच रोड क्रॉसिंग येथील पुथिमारी आणि कांपूरमधील कोपिली नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Update: देशात कुठं पाऊस तर कुठं उष्णतेचा तडाखा, वाचा हवामान विभागाचा अंदाज