Agriculture Export : भारताच्या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत (Agriculture Export) 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (2022-23) दुसऱ्या तिमाहीत 13 हजार 771 डॉलरवर ही निर्यात पोहोचली आहे. फळे, भाज्या आणि तृणधान्ये आणि प्रक्रियाकृत खाद्यान्नाच्या निर्यातीत या आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली आहे. प्रक्रियाकृत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यात, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 42 टक्क्यांची वाढ झाली आहे.


गेल्या सहा महिन्यात (एप्रिल ते सप्टेंबर) कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या 2021-22 या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. वाणिज्य माहिती आणि सांख्यिकी महासंचालनालयाने (डीजीसीआय अँड एस) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) एकंदर निर्यातीमध्ये वाढ होऊन ती एप्रिल ते सप्टेंबर 2022 या काळात 13 हजार 771 दशलक्ष डॉलरवर पोहोचली. गेल्या वर्षी याच काळात ही निर्यात 11 हजार 56 दशलक्ष डॉलरवर होती. 


कृषीसह प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी 23.56 अब्ज डॉलरचं लक्ष


वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं अपेडाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळं 2022-23 या वर्षासाठीच्या निर्यातीच्या उद्दिष्टापैकी 58 टक्के निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यातच झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अपेडाने कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी 23.56 अब्ज डॉलरचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या आर्थिक वर्षात सहा महिन्यांच्या काळात यापूर्वीच 13.77 अब्ज डॉलर निर्यात झाली आहे. डीजीसीआय अँड एसच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रक्रियाकृत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत एप्रिल ते सप्टेंबर 22 या काळात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 42.42 टक्के इतक्या उल्लेखनीय वृद्धीची नोंद झाली आहे. तर ताज्या फळांमध्ये चार टक्क्यांच्या वाढीची नोंद झाली आहे.


डाळींच्या निर्यातीत मोठी वाढ


तृणधान्यांसारखी प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने आणि इतर प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत 29.36 टक्के वाढीची नोंद झाली आहे. डाळींच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 144 टक्के वाढीची नोंद झाली आहे. मसूर डाळीच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या (एप्रिल ते सप्टेंबर 2021-22) 135 दशलक्ष टनांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात याच कालावधीत( एप्रिल ते सप्टेंबर 2022-23) 330 दशलक्ष टनांपर्यंत वाढ झाली आहे.


निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध देशांमध्ये व्यापारी प्रदर्शन


कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीमधील वाढ म्हणजे केंद्रानं कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचा परिपाक आहे. विविध देशांमध्ये व्यापारी प्रदर्शनांचे आयोजन, भारतीय दुतावासांच्या सहकार्याने विशिष्ट उत्पादने आणि सामान्य विपणन मोहिमा राबवून चांगली मागणी असलेली बाजारपेठ शोधणे यांसारख्या उपक्रमांचा त्यात समावेश होता. सरकारने देखील भारतात जीआय मानके मिळालेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीसोबत कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांचे खरेदीदार आणि विक्रेते यांच्या आभासी मेळाव्यांचे तसेच अमेरिकेसोबत हस्तकलाकृतींच्या मेळाव्यांचे आयोजन केले होते. निर्यात होणार असलेल्या उत्पादनांच्या दर्जाचे प्रमाणीकरण विनासायास होण्यासाठी अपेडाने देशभरात 220 प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे. ज्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी निर्यातदारांना सेवा उपलब्ध होत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Grapes: पावसामुळे द्राक्षाचा हंगाम लांबणार? द्राक्षांच्या निर्यात धोरणांमुळे शेतकरी त्रस्त