Raju Shetti : केंद्र आणि राज्याचे लक्ष वेधण्यासाठी तसेच न परवडणारी ऊसाची शेती फायद्यात येण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत, यासाठी हे लाक्षणिक आंदोलन करण्यात येत आहे. काही ठोस निर्णयांची आवश्यकता आहे. हा सविनय सत्याग्रह आहे. शेतकऱ्यांनी दोन दिवस ऊसाच्या तोडी नाकारायच्या आहेत. वाहनधारकांनी दोन दिवस वाहतूक करायची नाही, असा निर्णय घ्यायचा आहे. त्यातूनही कोणी रस्त्यावर ऊस आणल्यास सविनय पद्धतीने सांगायचं आहे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे. 


आज आणि उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन होणार आहे. यंदाच्या हंगामातील स्वाभिमानीचे हे पहिलेच आंदोलन आहे. केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3500 करावा, इथेनॉलच्या दरात 5 रुपयांची वाढ करावी तसेच ऊस परिषदेत केलेली एफआरपी अधिक 350 रुपये ही मागणी कारखानदारांनी पूर्ण करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. कारखानदारांना याबाबत काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी आवाहन केलं आहे. कारखानदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो त्यावर स्वाभिमानीची पुढील रणनीती ठरणार आहे. 


ते म्हणाले की, शेतकऱ्यांची अस्वस्थता समजू शकतो, राग समजू शकतो, पण व्यक्त करण्याची ही वेळ नाही. 18 तारखेनंतर मी निश्चितच तुम्हाला कार्यक्रम देणार आहे, त्यावर निश्चितच तुम्ही राग व्यक्त करा. आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा.  शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ऊसतोड कामगार, वाहन चालक आणि साखर कारखानदार यांनी प्रतिसाद द्यावा, असेही ते म्हणाले.


हिवाळी अधिवेशनात एकरकमी FRP चा कायदा मंजूर करावा


ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यातील एफआरपी (FRP) देण्याऐवजी एकरकमी FRP देण्यात यावी, हिवाळी अधिवेशनात यासाठीचा कायदा मंजूर करावा, तसेच, एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ करावी या प्रमुख मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात आज आणि उद्या दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, कारखानदारांना दोन दिवस कारखाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. जर कारखाने बंद ठेवले नाहीत तर संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या