हिंगोली : मराठवाडा हा हळदीचे उत्पादन (Turmeric Production) करणारा नंबर अग्रेसर प्रदेश, पण बाजारपेठ, व्यापारी कौशल्य, व्हरायटीपासून इथला शेतकरी कोसोदूर असल्याचं चित्र. यामुळे पिकतंय पण विकत नाही, अशी मराठवाड्याची अवस्था. मात्र हिंगोलीतील वसमत येथे स्थापन झालेल्या बाळासाहेब ठाकरे हरीद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रामुळे (Balasaheb Thackeray Haridra Research And Training Center) येथे हळदीची सुवर्णक्रांती होत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आशेचे सोनेरी किरण दिसत आहे.


महाराष्ट्रातील हे पहीलेच हळद संशोधन केंद्र स्थापन झालं असून याचा मराठवाड्यासहीत अखंड महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील हळद शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हळद उत्पादनाच्या सर्व समस्यांचे निराकारण करण्यासाठी हे केंद्र कार्यरत आहे.


हळद केंद्राचे अध्यक्ष हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं की, राज्य शासनाकडून हळद संशोधन केंद्रासाठी 100 कोटी रूपयाचा निधी मंजूर आहे. त्यापैकी 10 कोटी मिळाला आहे. त्यानुसार केंद्राचे हळद शेतकऱ्यांच्या हितासाठी काम सुरू आहे. यामध्ये हळद उत्पादनापासून विपनणापर्यंतच्या सर्व बाबी आहेत. त्यामुळे बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याबरोबरच मालाचे योग्य आणि चांगला बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने हळद संशोधन केंद्राचा हळद उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
       
शेतकऱ्यांच्या मृत्यूचे मराठवाड्यात सर्वाधिक प्रमाण आहे. निसर्ग, आधुनिकीकरण- यांत्रिकीकरण, अपुरे पाणी आणि सिंचन व्यवस्थापन अशा अनेक कारणांमुळे इथल्या शेतीला मर्यादा येतात. मात्र, हळदीचे उत्पादन इथे मोठ्या प्रमाणात होते. भारताचा हळद लागवडीत जगात प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या एकूण टक्केवारीत 81 टक्के हळद भारतात पिकते. यातील 80 टक्के हळद ही महाराष्ट्रातील मराठवाड्यात, त्यातही ते प्रामुख्याने हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी येथे पिकते. 2019- 20 च्या आकडेवारीनुसार देशातील हळद पिकाखालील क्षेत्र 2.18 लक्ष हेक्टर आहे. त्यातील महाराष्ट्रातील 54,885 आहे. तर 2020-21 च्या आकडेवारीनुसार 1.02 हेक्टर महाराष्ट्रात व मराठवाड्यातील 82,009 म्हणजे (80 टक्के) आहे.


सध्या मराठवाड्यासहीत राज्यातील इतर जिल्ह्यात हळद पिकाखालील क्षेत्रात वाढ होतेय. पण शेतकऱ्यांना लागवड, प्रक्रिया, निर्यात या अनुषंगाने अनेक समस्यांना सामोरे जावे लागतंय. ज्यात गुणवत्तापूर्ण व रोगमुक्त बियाणांची अनुपलब्धता, प्रादेशिक हवामानानुसार निर्यात, प्रक्रिया, औषधे व सौदर्य प्रसाधने इ. दृष्टीकोनातून आवश्यक वाणांची अनुउपलब्धता, अयोग्य लागवड पद्धती, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, पाणी व्यवस्थापन, काढणीपश्चात अपुऱ्या प्रक्रिया व साठवणूक सुविधा, विपणन व निर्यात विकास, हळदीतील भेसळ, प्रशिक्षण व उत्पादक विकास ईत्यादीचा समावेश होतो. यासाठीच हळद संशोधन काम करतेय.


हळद संशोधन केंद्राचे काम


हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना किफायतशीर, खात्रीशीर व व्यवहार्य तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे, हळद उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी करुन त्याचे उत्पन्न दुप्पट करणे, हळद उत्पादनात आदर्श पध्दती तयार करणे, हळद काढणी, प्रक्रिया बाबतीत नवीन यांत्रिकीकरणाचे संदर्भ वापरणे, हळद पॅकेजिंग, विपणन, ब्रेडींग, निर्यात याकरिता बाजार साखळी विकसित करणे, हळद लागवड ते विपनणाच्या अनुषंगाने शेतकरी, प्रक्रियादार, निर्यातदारांना येत असलेल्या समस्यांची सोडवणूकही करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 


शेतकऱ्यांसाठीच्या सेवा


बियाणे लागवड, साहित्य, अवजारे बँक, साठवण गृह, वी. किरण यंत्र / युनिट, ड्रायपोर्ट, बियाणे चाचणी, प्रयोगशाळा, उती संवर्धन, माती व पाणी परीक्षण, कुरकुमीन अर्क व अंश तपासणी, उर्वरीत किटक बुरशी आणि तणनाशक तपासणी, प्रशिक्षण, अधिसूचना -समस्या, रोग, पावसाचा इशारा, सोलार ड्रायर, स्लायसर, टिशू कल्चर, कस्टम हायर सेंटर अशा आदी सुविधेचा समावेश आहे.


हळदीचा पारंपारीक ते आधुनिक उपयोग


हळदीतल्या कुरकुमीनपासून कॅन्सरसारख्या आजारावर गोळ्यांची निर्मिती, शरीरावरील जखमेवर लावण्यासाठी हळद पावडरऐवजी ट्यूब, हळदीच्या पानाचाही जंतुनाशक म्हणून वापर, हळदीचे दुध अनेक अजारांवर रामबाण उपाय, प्रक्रीया करून हळदीपासून निघणारी साल ही मच्छररोधक व अगरबत्तीमध्ये वापर, हळदीच्या कोचाची भारतामध्ये कुंकु निर्मिती, हळदीच्या सालीचीही मागणी, रंगनिर्मिती, यासहीत अर्क व कोचापासून केमिकल निर्मिती.


सौंदर्य प्रसाधने


जगात एक नंबरची बाजारपेठ असलेल्या सौदर्य प्रसाधनांमध्ये हळदीला अनन्यासाधारण महत्व आहे. त्यासाठी कारखाने किंवा त्यापद्धतीनुसार हळद पावडर, ट्युब, क्रीम, हळकुंड, हळदीचे तेल आदींची निर्यात.


हळदीपासून मसाल्याची निर्मिती


यात भागधारकांचा समावेश करून भारतीय मसाल्यांच्या उत्कृष्टतेसाठी पुढाकार घेणे सोईचे आहे. यात हळद पावडर, हळकुंड, सुगंधी तेल, ओलीओरिझीन निर्मिती, हळदीचे लोणचे आदी बनवणे सोईचे आहे. अशा या वाढलेल्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी संशोधन केंद्र कार्यरत आहे. 


ही बातमी वाचा :