Sadabhau Khot : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 1 लाख रुपये मदत करा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बैठक घेऊन जे साखर कारखाने 1 मे नंतर ऊस गाळप करणार आहेत, त्यांना प्रति टन 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. या राज्यामध्ये 15 लाख हेक्टर ऊस हा गाळपा विना राहणार आहे. त्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची घोषणा सरकारने करायला पाहिजे होती, असेही खोत यावेळी म्हणाले.


सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम  


हे सरकार कारखानदारांचं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मात्र मदत केली नाही. आता ऊसाची चिपाडं झालेली आहेत. ऊसाचं वजन घटलेलं आहे, म्हणूनच ज्यांचा ऊस 1 मे नंतर जाईल त्या शेतकऱ्यांना प्रति टन 1000 रुपये अनुदान सरकारने देण्याची गरज होती. परंतु हे सरकार कारखानदारांना पोसणारं आहे का ? शेतकऱ्यांना मारत आहे. शेतकऱ्यांचे फड पेटत आहेत. माझा बळीराजा आत्महत्या करत आहे. हे निर्ढावलेलं सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचा आरोप यावेळी सदाभाऊ खोत यांनी सरकारवर केला.
दरम्यान, सरकारच्या या शेतकरी धोरणांविरोधात 20 मे ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी (ता. माढा) इथे आंदोलनाचा एल्गार पुकारणार आहे, असल्याची  प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.


मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय झालं
 
राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक आहे. त्यानंतर  शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील, असे निर्देश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले आहे. 1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी 200 रुपये प्रति टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या  हितासाठी  1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.


महत्वाच्या बातम्या: