Grape Farmers : कीटकनाशक टाकल्याने सुमारे दहा एकर द्राक्ष बागेचं नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव तनाळी परिसरात घडली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाने या बागेची पाहणी करुन, नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसर हा द्राक्ष बागांसाठी प्रसिद्ध असून, साधारण 10 हजार एकरावर या भागात द्राक्ष बागा आहेत. काही दिवसापूर्वी कासेगाव येथील सुनील गवळी यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावर असणाऱ्या सुपर सोनाका द्राक्ष बागेवर क्लोरो फायरीपास हे कीटकनाशक 30 ते 40 ग्रॅम खोडावर पावडर फवारणी केली होती. त्यानंतर पिके लागलेले द्राक्षांचे घड जागेवर सुकू लागले असून मण्यांचा ऱ्हास होत आहे. तसेच झाडाच्या कोवळ्या फांद्यांची साल फाटून त्या जागेवर जळू लागल्याने सुनील गवळी यांनी तातडीने विक्रेत्याकडे आणि कृषी विभागात याच्या तक्रारी केल्या. त्यानंतर पंढरपूर उपविभागाचे कृषी अधिकारी तळेकर यांनी पथकासह बागेची पाहणी केली. त्यानंतर या तक्रारीमध्ये तथ्य दिसून आले आहे. यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी याची सॅम्पल तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवली आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे सुनील गवळी यांचे जवळपास 70 लाखांचे नुकसान झाले असून, याच पद्धतीने या कीटकनाशकाचा वापर केल्याने परिसरातील तीन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
एकीकडे खराब हवामानामुळे उत्पादन खर्च वाढला असताना दुसरीकडे उत्पन्नातही घट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, करकंब, बार्डी, जाधववाडी, आदी गावात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. येथील बहुतांश शेतकरी द्राक्षांचे मार्केटिंग करण्यापेक्षा बेदाणा निर्मितीला पसंती देतात. द्राक्ष उत्पादन हे प्रामुख्याने एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यातील खरड छाटणीवर अवलंबून असते. यावर्षी या दोन्ही छाटण्यानंतरच्या प्रतिकूल हवामानाचा सामना द्राक्ष उत्पादकांना करावा लागला. सलग दोन वर्षे कोरोनानंतरच्या लॉकडाउनचा द्राक्षाविक्रीवर आणि पर्यायाने दरावरही परिणाम झाल्याने द्राक्ष बागायतदार मेटाकुटीला आले होते. त्यात यावर्षी प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागल्यामुळे खते व कीटकनाशकांच्या मात्रा दुपटीहून अधिक वाढवाव्या लागल्या. परिणामी उत्पादनाचा खर्चही त्या प्रमाणात वाढत गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: