Onion Export : नाशिक जिल्ह्यासह राज्यातील इतर भागात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. कांद्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत असल्यानं याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. नाशिक जिल्ह्यात रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. त्यामुळे वाढीव उत्पादनाचा अंदाज घेत शासनाने कांदा निर्यातीच्या धोरणाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पुढील दोन महिन्यानंतर नाफेडने जास्तीत कांद्याची वाजवी दरात खरेदी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली आहे.
 
दरम्यान, कांदा लागवड ते साठवणूक, विक्री व्यवस्थापन यामध्ये उत्पादकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच वीज, पाणी, इंध दरवाढ, खतांच्या वाढत जाणाऱ्या किंमती याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


ज्यावेळी कांद्याचे दर वाढतात तेव्हा सरकारकडून दर कमी करण्यासाठी हालचाली केल्या जातात. कांद्याच्या दरात घसरण होत असताना राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणत्याही हालचाल होत नाहीत. सरकार याबाबत काहीच भूमिका घेतल नसल्याचे भारत दिघोळे म्हणाले. देशाला कांदा पुरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून केले जाते. मात्र, कांद्याला दर वाढला की त्याचे दर पाडण्याचे काम केले जाते. दर वाढले की, कांदा आयात करुन दर पाडले जातात असे दिघोळे म्हणाले. सरकारने जास्तीत जास्त कांदा निर्यात करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे दिघोळे म्हणाले.


सध्या नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याला 13 ते 14 रुपयांचा प्रतिकिलोला दर मिळत आहे. या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे कांद्याला प्रतिकिलो 30 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. राज्यातील नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. याबाबत आम्ही लवकरच सरकारला अधिकृत निवेदन देणार असल्याचे भारत दिघोळे यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: