Sunil Kedar News : ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकरी, शेजमजुराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक असून, शेळी-मेंढीपालन हा त्यावर सर्वोत्तम पर्याय असल्याचे वक्तव्य पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केले. ग्रामीण भागात शेळया-मेंढ्या असलेल्यांकडे चांगला उत्पन्नाचा स्त्रोत आहे. शेळीचे वजन वाढवणे आणि अधिक दूध देणारी शेळीची प्रजाती विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्याकडे सध्या देशी शेळीचे वजन 20 ते 25 किलो आहे. त्यांचे वजन किमान 60 किलोपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे केदार म्हणाले.


पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे आदी उपस्थित होते. शेळीची दूध देण्याची क्षमता वाढवण्याचाही प्रयत्न आहे. यामध्ये यश आले तर ग्रामीण अर्थव्यवस्था नक्कीच सुधारेल, असा विश्वास यावेळी केदार यांनी व्यक्त केला. यावेळी पशुसंवर्धन विभागातील 82 अधिकाऱ्यांचा गुणवंत पशुवैद्यक पुरस्काराने गौरव करण्यात आला.




कोरोना काळात पशुसंवर्धन विभागाने चांगले काम


कोरोना कालावधीत आर्थिक अडचण असतानाही कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाने चांगले काम केल्याचे केदार म्हणाले. विभागाचे स्थान कायम उंचीवर राहील, असाच आपला प्रयत्न आहे. पशुसंवर्धन विभागात संशोधन व विकासाला संधी आहे. शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील अधिकारी आहेत. त्यामुळे आपल्या गावातील पशुपालक शेतकऱ्यांना तसेच विभागाला नवीन दिशा कशी देता येईल. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.


'सुंदर माझे कार्यालय' ही मोहीम


मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत  फिरते पशुचिकित्सा केंद्र सुरु करण्यात आली  आहेत.  कोरोना कालावधीतही पशु पालकांना चांगली सेवा देण्यात आली. या कालावधीत कुक्कुटपालन व्यवसायाने उभारी घेतली असल्याचे मत आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केले. कोरोना कालावधीत प्रयोगशाळेची गरज लक्षात घेत शासनाने तत्परतेने त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून, काम प्रगतीपथावर आहे. पशुसंवर्धन विभागाने 'सुंदर माझे कार्यालय' ही मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कार्यालयाचे सुशोभीकरण केले जाणार आहे.


 लोकर वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाअंतर्गत पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत सुरु करण्यात आलेल्या लोकर वस्तु विक्री केंद्राचे उदघाटन मंत्री केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून लोकर उत्पादने तसेच शेळीचे दुध व पुरक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक शशांक कांबळे यांनी दिली.