Agriculture News : राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. त्यामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, काही भागात अद्यापही पेरणी (Sowing) योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना (Farmers) अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी योग्य पावसाशिवाय पेरणीची घाई करु नये असं आवाहन कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे (Agriculture Superintendent Manoj Kumar Dhage) यांनी केलं आहे.
100 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये
गेल्या चार-पाच दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये खामगाव, शेगाव, देऊळगाव राजा, चिखली, जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 70 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. त्यामुळं या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. तर इतर तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडल्याने शेतकरी आता पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे 100 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
यंदा मान्सून राज्यात वेळेवर दाखल झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. परंतू, नांदेड जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनी बी- बियाणांची खरेदी केली आहे. शेतीच्या मशागतीचे कामे देखील आटोपून खरिपाच्या पेरणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सज्ज झाला आहे. परंतू जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचे आगमन झाले नाही. काही तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. या आठवड्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस अपेक्षित आहे.
अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस नाही
दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागातील शेतकरी पेरणीच्या कामांना लागले आहेत. मात्र, अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या: