Yavatmal Agriculture News : राज्यात सध्या पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच काही भागात शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. दरम्यान, अशातच आता अतिवृष्टीनंतर यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मिरची या पिकांवर वाणू अळीचे (Millipede) संकट आलं आहे. या वाणू अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
सोयाबीनसह तूर मिरचीवर वाणू अळीचा प्रादुर्भाव
अतिवृष्टीने आधीच शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पिक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. अशातच आता वाणू किडीने सोयाबीन पिकावर आक्रमण केलं आहे. त्यानंतर मिरची पिकावर देखील वाणू किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आर्णी तालुक्यातील कोपेश्वर येथील 50 एकर शेती त्यामुळं उध्वस्त झाली आहे. या खरीप हंगामात शेतकरी अतिवृष्टीमुळं संकटात सापडले आहेत. दुबार तिबार पेरणीनंतर शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न पडेल याची शाश्वती नाही. त्यातच विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या आर्णी तालुक्यातील कापेश्वर येथे तूर, सोयाबीन, मिरची पिकावर गोगलगाय, वाणू अळीने आक्रमण केले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.
तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
वाणू अळीच्या प्रादुर्भावाबाबत आम्ही कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. अद्याप अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. तसेच तहसीलदार यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी आमच्याकडे याबाबतचे काही काम नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतीचे काम हे कृषी आयुक्तालयाकडे राहते असे तहसीलर यांनी सांगितल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणार असल्याचे शेतकरी प्रकाश राठोड यांनी सांगितले. तिथेही आमची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा देखील यावेळी राठोड यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी केली मदतीची मागणी
गोगलगाय आणि वाणू अळीमुळं मोठ्या प्रमाणात आमच्या शेतीचं नुकसान होत आहे. याकडे कृषी विभागाचे काही लक्ष नसल्याची माहिती शेतकरी बालाजी ठाकरे, यांनी दिली. गोगलगायीचा सोयाबीनसह कापूस तूर पिकावर मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शासनानं आम्हाला मदत करावी अशी मागणी देखील ठाकरे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: