wardha News : विद्युत जोडणी न करताच शेतकऱ्याला 20 हजार रुपयांचे ज्यादाचे वीज बिल आल्याची घटना घडली आहे. ही घटना वर्धा जिल्ह्यातील वडनेर बोपापुर या ठिकाणी घडली आहे. मनोहर रामचंद्र झाडे असे त्या शेततऱ्याचे नाव आहे. वारंवार तक्रारी करुनही शेतकऱ्याकडे दुर्लक्षच केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रकरण नेमकं काय?
बोपापूर येथील शेतकरी मनोहर रामचंद्र झाडे यांची बोपापूर शिवारात सहा एकर शेती आहे. वर्षाला किमान तीन पिके घेता यावी, म्हणून त्यांनी शेतात बोअरवेल खोदली. कृषीपंपाच्या विद्युत जोडणीसाठी महावितरणकडे रीतसर अर्जही केला. जुळवाजुळव करुन 6 हजार 807 रुपयांचा डिमांड भरला. परंतू, अद्यापही शेतातील कृषीपंपासाठी विद्युतजोडणी झाली नाही. महावितरणकडून विद्युत मीटरही बसवण्यात आलेला नाही. तरीही पाच महिन्यांनी थेट 20 हजार 180 रुपयांचे अवाजवी वीज बिल आले आहे. महावितरणच्या या अजब कारभारानं शेतकऱ्याला अडचणीत टाकलं आहे.
दरम्यान, महावितरण कंपनी नेहमी विविध कारणाने चर्चेत असते. अनेकवेळा शेतकर्यांच्या कृषीपंपाला विज जोडणी न देताच महावितरण कंपनीकडून अनेक शेतकऱ्यांना वीज बिले येत असतात. अनेकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना वाढीव बिले देखील आलीआहेत. अनेकवेळा शेतकऱ्यांना तक्रारी करुन देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांना पाचची मोटर असताना साडेसातच्या मोटारीचे बील तर दहाची मोटार असताना बाराच्या मोटारीचे बील आल्याचे प्रताप देखील अनेकवेळा घडले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. नाहक शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहेत.
महावितरणच्या कारभाराविरोधात अनेक वेळा शेतकरी आक्रमक देखील होतात. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. आता वर्ध्यामध्ये घडलेला प्रकार तर अजबच आहे. शेतकऱ्यला विद्युत जोडणी न देताच वीज बिल आल्याने शेतकऱ्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. यानिमित्ताने पुन्हा महिवितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: