Increase Vegetable Prices : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या (Vegetable ) उत्पन्नावर झाला आहे. पावसामुळं शेतातील भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळं बाजार समितीत येणारी भाजीपाल्याची आवक चांगलीच घटली आहे. परिणामी दरात मोठी वाढ झाली आहे. शंभरीच्या वर भाजीपाल्याच्या किंमती गेल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.


नेहमी होणारी 650 ते 700 भाजीपाला गाड्यांची आवक आता 500 वर आली आहे. नाशिक, नगर, सातारा, सांगली भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाशी बाजार समितीत येत असतो. त्याचबरोबर शेजारील राज्यातून भाजापीला नवी मुंबईत येत असतो. यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातून भाज्यांची आवक होत असते. मात्र, परराज्यातील आवकही कमी झाल्यानं याचा परिणाम भाजीपाल्याच्या किंमतीवर झाला आहे. 50 ते 60 रुपये किलो असलेल्या भाज्या आता शंभरीच्या वर गेल्या आहेत. टोमॅटो सोडले तर बहुतांश भाज्यांचे दर गगनाला फिडले आहेत. 


पाहा कोणत्या भाज्यांना किती दर ?


वटाना - 140
वांगी - 80
कार्ली - 100
शेवगा - 120 
गवार - 140
ढोबळी - 100
भेंडी - 120
टोमॅटो - 40 
काकडी - 50 
गाजर - 80
कोबी - 80
मिरची - 120


मेथी - 20 रुपये प्रति जुडी  
कोथिंबीर - 20 रुपये प्रति जुडी  
पालक - 20 रुपये प्रति जुडी  


पावसाळ्यात पालेभाज्यांची होणारी आवक दुय्यम दर्जाची असते. कारण पावसामुळं पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण जास्त असते. मार्केट यार्डातून माल खरेदी करुन विक्रीसाठी नेला तरीही स्टॉलवर ग्राहक येत नाहीत. त्यामुळं मालाची विक्री होत नाही. परिणामी नुकसान सहन करावं लागते. त्यामुळे बाजारपेठेत मालाची होणारी आवक कमी होते. परिणामी भाजीपाल्यांच्या दरात वाढ होते. दरात वाढ झाल्याचा फायदा मात्र, ज्या शेतकऱ्यांजवळ विक्रीसाठी शेतमाल आहे त्यांना होत आहे.