Agriculture News : सध्या राज्यात काही ठिकाणीच चांगला पाऊस झाला आहे. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असमाधानकारक पाऊस झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी 270 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ 134 मिलीमीटर पाऊस झाला आहे. खरीप हंगामाबाबतचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावेळी ही माहिती देण्यात आली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला.  गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ 13 टक्केटच म्हणजे 20.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.


मंत्री सुभाष देसाई आज शहरातील पाणी पुरवठ्याचा आढावा घेणार


कमी पावसामुळं शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे आज (29 जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार याबाबत आढावा मंत्री सुभाष देसाई घेणार आहेत. दरम्यान राज्यात 496 टँकर्सने पाणीपुरवठा होत आहे. राज्यात 27 जूनअखेर 610 गावे आणि 1 हजार 266 वाड्यांना 496 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 66 तर खासगी टँकर्सची संख्या 430 इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळं मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत 31 ने तर टचाईग्रस्त गावांच्या संख्येत 24 ने आणि वाड्या वस्त्यांच्या संख्येत 130 ने घट झालेली आहे.


राज्यात बहुतांश (Maharashtra Rain Update) ठिकाणी जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मागील आठवड्यापासून  पावसाचं आगमन झालं आहे. मात्र जून महिन्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित होतं, तेवढा पाऊस अजून पडलेला नाही. जून महिन्यात एकूण सरासरीच्या 50 टक्के कमी पाऊस झाला आहे.  विदर्भात तर हा आकडा यापेक्षाही कमी आहे. कारण राज्यात सर्वात कमी पाऊस विदर्भात झाला आहे. राज्याच्या  परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यात पावसानं जूनची सरासरी ओलांडली आहे. या तिन जिल्ह्यात मिळून सरासरी 32 टक्के अधिक पाऊस पडला आहे.