Dhule News : साक्री तालुक्यातील (Sakri Taluka) चिकसे शिवारात पिंपळनेर येथील शेतकरी निसार शेख यांनी तुर्कस्थानातून बाजरीचं बियाणं आयात करून शेतात पेरणी केली. निसार शेख यांनी या 'तुर्की' बाजरीचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे. बाजरीचं पीक 12 फूट उंचीपर्यंत जातं. शिवाय त्याला लागलेलं कणीस तब्बल चार फूट लांब होतं. भाकरी करण्यासाठी ही बाजरी चांगली असून तिला चव देखील छान असल्याचं शेतकरी निसार शेख हे सांगतात. तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचं उत्पादन घेण्याचा हा धुळे जिल्ह्यात पहिलाच प्रयोग आहे.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील शेतकरी निसार शेख यांची चिकसे शिवारात शेती आहे. यावर्षी निसार शेख यांनी शेतात बाजरीचं उत्पादन घेतलं आहे. विशेष म्हणजे, बाजरी पेरणीसाठी शेख यांनी चक्क तुर्कस्थान या देशातून बियाणं मागवलं आहे. यासाठी प्रतिकिलो हजार रुपये खर्च त्यांना बियाण्यासाठी आला. शेख यांनी शेतात तुर्की बाजरीची पेरणी केली. शिवाय बाजरीचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे.
याविषयी बोलताना निसार शेख यांनी सांगितलं की, बाजरी पेरताना प्रति एकर सव्वा किलो बियाणं पेरणीसाठी लागलं. साधारणतः बाजरी प्रमाणेच इतर मशागतीची कामं आणि खतं या बाजरीच्या पिकास द्यावी लागतात. तुर्की बाजरीचं उत्पादन प्रति एकर 60 क्विंटलपर्यंत येते प्रथमच तुर्की बाजरीची पेरणी धुळे जिल्ह्यात होत असल्यानं यापूर्वी अशा वाणाच्या पेरणीचा अनुभव नव्हता. पिकाची जोपासना करताना काही चुकाझाल्या आहेत. मात्र पेरणी दाट झाली आहे. याचा परिणाम बाजरीचं उत्पादन थोडं घटण्याचा अंदाज शेख यांनी व्यक्त केला आहे.
तुर्कस्तानातील बाजरीची चव आपल्या गावठी बाजरी प्रमाणेच असते. शिवाय ती आरोग्यवर्धकही असल्याचंही म्हटलं जातं. बाजरीच्या या वाणास टपोरे दाणे आहेत. स्थानिक बाजारपेठ जिथे उपलब्ध आहे, तिथे या बाजरीची विक्री करता येऊ शकते. साक्री तालुक्यातील चिकसेसह पंचक्रोशीत हा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्यानं परिसरातील शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. बाजरीच्या पिकाची चांगली वाढ झाली आहे. 12 फूट उंचीपर्यंत हे पीक जातं. त्यावर तीन ते चार फूट लांबीचं कणीस आतापर्यंत लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :