Dhule News : लम्पी आजाराच्या (Lumpy Skin Disease) पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले धुळे (Dhule) जिल्ह्यातील जनावरांचे बाजार (Cattle Market) पूर्वीप्रमाणे भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून जनावरांचे बाजार आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे जवळपास 36 कोटीहून अधिक नुकसान झालं आहे. सध्या लम्पी आजाराचा संसर्ग आटोक्यात आल्याने बाजार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लम्पी आजारामुळे सप्टेंबर 2022 पासून जनावरांचे बाजार बंद
संपूर्ण राज्यात गोवंशीय प्राण्यांमध्ये लम्पी या चर्मरोग आजाराचा संसर्ग मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झाला होता. धुळे जिल्ह्यात या आजारामुळे आतापर्यंत 173 जनावरे दगावली आहेत. या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 2 सप्टेंबर 2022 रोजी आदेश देत जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद केले होते. तसंच जनावरांच्या वाहतुकीवर देखील बंदी घालण्यात आली होती. मात्र सध्या लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरला नसला तरी काही प्रमाणात ही साथ आटोक्यात आली आहे. सोबतच जनावरांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याने जनावरांचे बाजार भरवण्यासह वाहतुकीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
जनावरांचे बाजार भरवण्यासाठी 'हे' नियम असतील!
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतूक करताना 28 दिवसांपूर्वी गुरांना चर्मरोग प्रतिबंधक लस दिलेली असावी.
- तसेच वाहतूक करताना गुरांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या कानात टॅग नंबर आणि इनफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आलं आहे
- संक्रमित किंवा संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करताना आरोग्य प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे.
- हे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी अथवा गट अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या सक्षम अधिकाऱ्यांकडून घ्यावं, प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहेत.
- गुरांची वाहतूक करताना आरोग्य दाखला जनावरांची वाहतूक अधिनियम 2001 मध्ये नियम क्रमांक 47 अन्वये स्वास्थ्य प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.
- जिल्ह्यातील पशु बाजारात यापुढे टॅगिंग आणि रोगप्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय खरेदी विक्रीचे व्यवहार करु नये.
संबंधित बातमी
Lumpy Skin : दिलासादायक! धुळे जिल्ह्यात लम्पी आजार आटोक्यात आणण्यात यश, 2 हजार 588 जनावरे लम्पीमुक्त