परभणी : भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण देशच नव्हे तर अन्नधान्यात निर्यातदार देश म्हणुन ओळखला जातो. भारताची अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्राशी निगडीत आहे. आज देश अन्नधान्य, दूध उत्पादन, फळे आणि भाजीपाला उत्पादनात जगात आघाडीवर आहे. जगातील सर्वात जास्त पशुधन आपल्या देशात आहे. हे सर्व कृषी तंत्रज्ञान आणि शेतकरी बांधवाच्या अथक परिश्रमाने शक्य झाले आहे. आज हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर परिणाम होत आहे. विद्यापीठ निर्मित हवामानास अनुकूल कृषी तंत्रज्ञान, विविध पिकांची वाण शेतकरी बांधवापर्यंत गेली पाहिजेत. तसेच विद्यापीठाने बदलत्या हवामानास अनुकूल उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यावा. पाऊसात अधिक दिवसाचा खंड पडला तरी शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणाची निर्मिती केली पाहिजे, असे प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्मा, कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्य आयोजन दिनांक 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रागंणात करण्यात आले आहे. मेळाव्याचे उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. माननीय कृषी मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांनी मेळाव्याचे ऑनलाईन माध्यमातुन उदघाटन केले.
मार्गदर्शनात कृषिमंत्री धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, परभणी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा आणि कृषि प्रदर्शनीच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाविण्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्याची सुवर्ण संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध झाली असुन याचा लाभ मराठवाडयातील शेतकरी बांधवांनी घ्यावा. यात सहभागी सहा राज्यातील शेतकरी, तज्ञ आणि कृषि उद्योजक एकत्रित येत आहेत, त्यांची विचारांची देवाणघेवाण होणार आहे. अनेक शेतकरी आपआपल्या शेतीत चांगले प्रयोग करतात, शेतकरीही एक संशोधक आहे. यामुळे विविध राज्यातील शेती व तेथील शेतकरी बांधवाचे अनुभव जाणुन घेण्याची संधी आहे. केद्र शासन आणि राज्य शासन शेती आणि शेतकरी विकासाकरिता अनेक योजना राबवित आहेत. पी एम किसान योजना तसेच नमो महासन्मान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवा होण्याकरिता पुढाकार घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरलेली पोकरा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली. खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजने अधिक सोयीची करण्यात आली. सेंद्रीय शेती विषमुक्त शेती योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शेतकरी कल्याण हेच शासनाचे ध्येय आहे. यावर्षी पाऊसाच्या अनियमिततामुळे काही भागात उत्पादनात घट आली, जास्तीत जास्त शेतकरी बांधवा नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात आला.
पाशा पटेल म्हणाले की, हवामान बदलाचा मानवी जीवनावर आणि शेतीवर मोठा परिणाम होत आहे. हवामानात कार्बनची पातळी वाढ झाली आहे. जागतिक तापमान वाढ होत आहे, पर्यावरण वाचवायचे असेल तर जंगलाची वाढ होणे आवश्यक आहे, यामुळेच हवामान संतुलित राहील व शेती व्यवसायात शाश्वतता येईल. याकरिता सामाजिक आणि कृषि विद्यापीठ पातळीवर प्रयत्नांची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, शेती आणि शेतकरी विकास याकरिता आपणास कार्य करण्याची संधी आपणास मिळाली आहे. कृषी संशोधकांनी शेतकरी हा केंद्रबिदु ठेवुण समर्पित भावनेने कार्य करावे. परभणी कृषी विद्यापीठ विकसित बियाणास शेतकरी बांधवा मध्ये मोठी मागणी आहे, यावर्षी विद्यापीठातील 2000 एकर पडित जमीन वहती खाली आणून पैदासकार बीजोत्पादन दुप्पट करण्यात आले. येणा-या तीन वर्षात 50000 क्विंटल बीजोत्पादनाचा विद्यापीठाचे लक्ष आहे. विद्यापीठाने डिजिटल तंत्रज्ञानात आघाडी घेतली असुन यात कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देत आहे. गेल्या वर्षी 80 विद्यार्थी आणि प्राध्यापक 12 देशात प्रशिक्षण घेऊन आले आहेत, याचा लाभ संशोधनात होणार आहे. विद्यापीठ राबवित असलेला माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमामुळे शेतकरी – शास्त्रज्ञ यांच्यातील प्रत्यक्ष संवाद वाढला आहे.
मार्गदर्शनात कुलगुरू डॉ. ए के सिंग म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठात अनेक नाविण्यापुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. राष्ट्रीय पातळीवर डॉ इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली शेतीत क्षेत्रात ड्रोन वापराबाबतची प्रमाणित कार्य पध्दती निश्चित करण्यात आली, याचा लाभ शेतकरी बांधवा होणार आहे. भविष्यात कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते त्या दृष्टीने शेतकरी बांधवांनी विचार करावा, असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाचे विस्तार कार्य व मेळाव्याच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली. सुत्रसंचालन डॉ वनिता घाडगे देसाई यांनी केले आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. यावेळी आयोजित कृषी प्रदर्शनीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कृषि मेळाव्यात पश्चिम भारतातील महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, दीव-दमन आणि दादर नगर हवेली इत्यादी सहा राज्यातील शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्या, कृषि अधिकारी, कृषि विस्तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्या संख्येने सहभागी झाले आहेत. सार्वजनिक संस्था, खासगी कंपन्या, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्या ३०० पेक्षा जास्त दालनाचा असुन पशु प्रदर्शन, कृषि औजारांचे प्रदर्शन, विविध शेती निविष्ठा, बी बियाणे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमास शेतकरी बांधव, कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्या, कृषि अधिकारी, कृषि विस्तारक, आणि कृषी उद्योजक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ही बातमी वाचा :