Kisan Sabha : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नारुन अखिल भारतीय किसान सभेनं विभागीय पीक विमा परिषदेचं आयोजन केलं आहे. येत्या 8 जूनला शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी बीड जिल्ह्यातील परळी याठिकाणी पीक विमा परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पीक विम्याचा प्रश्न केंद्र सरकारच्या धोरणामुळं दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. राज्य सरकारकडून संपूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्हा पीक विमा पॅटर्नची शिफारस केली जात असताना, बीड जिल्ह्यातील शेतकरीच या पीक विमापासून वंचित राहत असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली.


दरम्यान, पीक विमा धोरणाचा उद्देश, सद्यपरिस्थिती, यातून समाधानकारक निष्पत्ती साधण्यासाठी या संदर्भातील सखोल मार्गदर्शन व्हावं यासाठी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ हे या पीक विमा परिषदेला संबोधीत करणार आहेत. याच परिषदेत शेतकऱ्यांच्या अतिरीक्त उसासह इतरही ज्वलंत प्रश्नावर चर्चा होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येऊन त्याची उकल करण्यासाठी, लढ्याची पुडील दिशा ठरवण्यासाठी 8 जूनचा पीक विमा परिषदेसाठी हजर पाहण्याचे आवाहन किसान सभेच्या वतीनं करण्यात आलं आहे.


काय आहेत प्रमुख मागण्या


1) सन 2020 चा करीप आणि रब्बी पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. सन 2018 आणि 2021 च्या पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे.
2) प्रधानमंत्री पीक विमा धोरण हे विमा कंपन्याच्या हिताचे रक्षण करणारे न राहता ते शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे असावे अशी त्यात सकारात्मक सुधारणा करण्यात यावी
3) ऊस गाळपास दिरंगाई झाल्यामुळं शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान व तूट भरुन काढण्यासाठी 1 एप्रिल नंतर गाळप झालेल्या सर्व उसाला प्रतिटन पाचशे रुपये नुकसान भरपाई शासनानं द्यावी
4) वेळेत ऊस न गेल्यामुळं पीक कर्जाची वेळेत परतफेड न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा.
5) पुढील ऊस हंगामात अतिरीक्त ऊस राहू नये यासाठी सक्षम कारखान्यांना सुरुवातीपासून गाळपाचूी परवानगी द्यावी, 
6) 14 दिवसाच्या आता उसाची एफआरपी द्यावी
7) कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी
8) मागणीप्रमाणे योग्य, खात्रीशीर सोयाबीण आणि कापसाचं बियाणं उपलब्ध करुन द्यावं
9) शेतकरी हित लक्षात घेऊन आयात निर्यात धोरणाची अंमलबजावणी करा
10) शेतकऱ्यांना शेतीसाठी हमाखास 24 तास वीज मिळावी
नुसती हमीभावाची घोषणा नको तर त्याबाबत कायदा हवा


या प्रमुख मागण्या या पीक विमा परिषदेत करण्यात येणार आहेत.