Wardha Rain News : आर्वी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून दोन दिवस संततधार पावसानं अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत. आर्वी तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, धानोडी, एकलारा यासह अनेक छोट्या गावातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणं खरेदी केलं आणि मेहनतीनं ते शेतजमिनीत रोवलं. शेतकऱ्यांसह त्यांची पत्नी कुटुंबीय आणि काही शेतकऱ्यांनी तर चिमुकल्यांना सोबत नेऊन देखील शेतात पेरणी केली. दिवस-रात्र त्याची काळजी घेऊन बीज अंकुरण्याकडे शेतकरी आशेनं पाहू लागला. पेरलेल्या बियाण्यांतून नुकतेच कोवळे कोंब उगवायला लागले होते, नवी पालवी फुटायला लागली होती. आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित हास्य फुलले होते. आता शेतकरी बहरलेल्या हिरवेगार शेताचं स्वप्न बघू लागला होता. मात्र क्षणात होत्याचं नव्हतं होईल हे शेतकऱ्यांनी विचारात घेतलं नव्हतं. काहीच दिवसांपूर्वी धूळपेरणी सुरू झाल्यावर पावसाने दडी मारली. जून महिन्यात विश्रांती वर गेलेल्या वरुणराजाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार एंट्री घेतली. आणि दोन दिवसांपूर्वी आर्वीतील गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. यात शेतातील पीक बहरण्याआधीच पेरलेले बियाणे या पावसाने वाहून नेले आहेत. मासोळीच्या नाल्यालगत असलेले सर्व शेतकऱ्यांची पेरणीच वाया गेली आहे. 



127 हेक्टर ते 133 हेक्टर पेरलेले क्षेत्र पाण्याखाली 


सोमवार आणि मंगळवार दोन दिवस झालेल्या पावसामुळे मासोळी नाल्याचे पाणी शेतात शिरली. नांदपूर येथील शेतकऱ्यांची 127 हेक्टर ते 173 हेक्टर पेरलेले क्षेत्र हे पाण्याखाली गेले असून शेताला तळाचे स्वरूप प्राप्त झालं. मुसळधार पाऊस बरसल्याने जोरदार सरींनी शेतातील पेरलेले बियाणे उकरून काढून वाहून नेले आहे. शेतकऱ्याचे पीक शेतकऱ्यांसाठी आपल्या लेकराप्रमाणे असतं,शेतकरी पिकाची पूर्ण काळजी घेतो. मात्र ही काळजी घेत असतानाच वरून राजाने मात्र आमच्यावर कसला तरी राग काढलाय का असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला.


शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट 


दिवसभर शेतात राबून उन्हातानात मशागत करून नवीन पीक घेण्यासाठी शेतकरी जमिनीला तयार करतात आणि त्यानंतर नवे बीज त्यात पेरतात. हे बीज पेरत असताना हिरवेगार बहरलेलं शेतीचे जणू स्वप्नच शेतकऱ्यांसह त्याचे कुटुंबीय बघत असतात. मात्र आर्वी तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर ,एकलारा,धानोडी, गावातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. आता दुबार पेरणी करण्यासाठी तरी पैसा कुठून आणावा? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.


जून महिन्यात शेतकऱ्यांच्या आभाळाकडे होत्या नजरा


जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं होतं. काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला मान दिला तर काहींनी पेरण्या सुरू ठेवल्या..परिणामी देवळी आणि हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे हे बोगस निघाले आणि बियाणे उगवलेच नसल्याची तक्रार देखील शेतकऱ्यांनी केली होती. त्या काळात पेरलेले बियाणे अंकुरण्यासाठी समाधानकारक पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला खरा मात्र काही ठिकाणी याचा चांगलाच फटका बसल्याचं बघायला मिळतोय.