ABP Majha Sting Operation: राज्यात बोगस बियाणे आणि वाढीव दराने त्याची विक्री करणाऱ्या लोकांविरोधात धाडसत्र सुरू आहे. तर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लोकांना सोडणार नाही अशी भूमिका कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी स्पष्ट केली आहे. मात्र त्याच अब्दुल सत्तारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत साडेआठशे रुपायाची कापसाची बॅग साडेबाराशेपासून तर 2300 रुपयांपर्यंत विकली जात आहे. हा सर्व प्रकार 'एबीपी माझा'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या पैठण मतदारसंघात हा सर्व प्रकार सुरू असल्याने खळबळ उडाली आहे.
कुठे काय आढळून आले?
पहिलं स्टिंग ऑपरेशन : सुरुवातीला 'एबीपी माझा'ची टीम पैठणला पोहचली. सायंकाळी 4.25 मिनटाला आम्ही कोर्ट रोडवरील एका कृषी दुकानात जाऊन कापसाच्या बियाणाची विचारपूस केली. ज्यात कब्बडी नावाच्या वानाबाबत विचारले असता, त्याची किंमत आम्हाला साडेबाराशे रुपये सांगण्यात आली. मला बाराशे रुपयांना मिळत असून, त्यात मला 50 रुपये उरतात, असेही दुकानदार म्हणाला. विशेष म्हणजे, सरकराने सर्वच कापसाच्या बॅगेची किंमत 853 रुपये निश्चित केली आहे.
दुसरं स्टिंग ऑपरेशन : पैठणनंतर आम्ही मंत्री संदिपान भुमरे यांचे गाव पाचोडला पोहचलो. यावेळी पाचोड ग्रामपंचायत गाळ्यात असलेल्या एका कृषी दुकानात आम्ही संकेत नावाच्या कापसाच्या बॅगेची मागणी केली. यावेळी त्याची किंमत तब्बल 2300 रुपये सांगण्यात आली. विशेष म्हणजे, आज पैसे देऊन बुक केल्यावर उद्या बियाणे मिळतील, असेही सांगण्यात आले. या बियाणेचे पक्के बिल देखील मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले.
तिसरं स्टिंग ऑपरेशन : पाचोड येथील आणखी काही कृषी सेवा केंद्रात आम्ही कापसाचे बियाणे घेण्यासाठी पोहचलो. यावेळी आणखी एका दुकानात असलेल्या तरुणाने आम्हाला कब्बडी नावाच्या बियाणेबाबत विचारले असता, त्याने 1200 रुपये किंमत सांगितली. विशेष म्हणजे, त्याच्यासोबत आणखी दुसरे बियाणे घेणं देखील बंधनकारक असल्याचे सांगितले.
महागड्या बियाणासोबत लिंकिंग देखील सुरु...
एकीकडे 853 रुपयांचे कापसाचे बियाणे 2300 रुपयांना विकले जात आहे. धक्कादायक म्हणजे, एवढ्या महागड्या किंमतीत बियाणे घेऊन देखील शेतकऱ्यांना बियाणाच्या लिंकिंगचा सामना करावा लागत आहे. कारण महागात मिळणाऱ्या या बियाणासोबत इतर बियाणे घेणे देखील बंधनकारक आहे. इतर बियाणे घेतल्यावरच कब्बडी, संकेत नावाचे वान तुम्हाला विकत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच कृषीमंत्री यांच्याच जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर राज्यात काय चित्र असेल असाही सवाल विचारला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :