वाशिम : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खताच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. पोटॅश खतांच्या एका पोत्यामागे 700 रुपयापर्यंत वाढ झाल्याची माहिती आहे. पोटॅशच्या किंमती वाढल्याने इतर खतांच्या दरात 200 ते 300 रु पर्यंत वाढ झालीये. त्यामुळे शेती उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असून त्याची झळ आता शेतकऱ्यांना बसणार असल्याचं स्पष्ट आहे. कोरोनामुळे आधीच बिकट असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट होणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून रासायनिक खतांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. 1150 रुपयाला मिळणारे 10:26:26 खताचे एक पोते आता 1600 रुपयांना विकत घ्यावं लागत आहे. पोटॅश च्या (MOP)च्या किमती वाढल्याने इतर खतांच्या दरात थोडे थोडे करून गेल्या 2 महिन्यात एका पोत्या मागे 200 रु ते 300 रुपयापर्यंत वाढ तर पोटॅश खताच्या 50 किलोग्रॅमच्या एका पोत्यामागे 700 रुपयापर्यंत वाढ झाल्याची माहिती आहे.
मात्र यामध्ये युरिया आणि DAP हे दोन खतं सरकारने आपल्याकडे राखीव ठेवल्याने त्यांचे जुने दर हे कायम असल्याच कळते.
इतर खतांच्या दरात 200 रुपयापासून ते 700 रुपया पर्यंत वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ आणि कंपन्यांच्या आयात खर्चामध्ये झालेली वाढ यामुळे देशातील रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. पण याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट, त्यानंतर दुष्काळ तसेच सातत्याने पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली आहे. आता रासायनिक खतांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात वाढ होणार असून तुलनेने त्याचा परतावा मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या :
- Fertilizer : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, रब्बी हंगामाची पेरणीच्या तोंडावर खतांच्या किंमतीत वाढ
- कोरोना संकटात रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या, दर कमी करण्यासाठी राज्याच्या कृषीमंत्र्यांचे केंद्र सरकारला पत्र
- शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका; खतांच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र