Chandrapur Mirchi Market: चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षी पासून बाजार समितीत मिर्चीचे सौदे भरवण्यास सुरुवात केली आहे. याचे अतिशय चांगले परिणाम समोर आले असून देशभरातील व्यापारी मिर्ची खरेदीसाठी चंद्रपुरात येत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांना देखील विक्रमी भाव मिळत आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मिर्ची पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय. राजुरा, कोरपना, चंद्रपूर, गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा या सारखे तालुके तर मिर्चीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत. मात्र जिल्ह्यात मिर्चीसाठी बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत होतं. स्थानिक व्यापारी देतील तो भाव घ्यावा लागत होता किंवा नागपूरला जाऊन विक्री करावी लागत होती. मात्र यावर्षीपासून चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिर्ची चे सौदे भरविण्यास सुरुवात केली आहे आणि याचे अतिशय चांगले परिणाम दिसून येत आहेत.


नागपूर जिल्ह्यातील बाजारात मिर्चीचे सौदे करणे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठं त्रासदायक ठरत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा मालाचा वाहतूक खर्च वाढत होता, सोबतच त्याठिकाणी माल घेऊन किती दिवस राहायचं म्हणून बऱ्याच वेळा व्यापारी देतील तो भाव घ्यावा लागत लागत होता. मात्र चंद्रपूर बाजार समितीत त्यांना नागपूर बाजारपेठे पेक्षा खूप जास्त फायदा होतोय.


चंद्रपूर जिल्ह्यातील मिर्ची ची गुणवत्ता अतिशय चांगली असल्याने देशभरातील व्यापारी थेट चंद्रपूर च्या बाजारसमितीत खरेदी साठी येत आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या अरुणिम, सी-फाईव्ह, हनुमान, जांभूळघाटी या सारख्या मिरची च्या व्हेरायटी ला मोठी मागणी आहे. नागपूरपेक्षा चंद्रपूरच्या बाजारात येऊन मिर्ची खरेदी केल्याने व्यापाऱ्यांना देखील फायदा होतोय.


पहिल्याच वर्षी व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे बाजारसमितीचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे लवकरच मिर्चीच्या सौद्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा बाजार समितीचा विचार आहे. ज्यामुळे येत्या काही वर्षात चंद्रपूर देशातील मिर्ची ची प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयाला येऊ शकेल.


ही बातमी वाचा: