Dilip Walse-Patil : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, या कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं, अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते, बियाणे व इतर निविष्ठा वेळेत मिळतील, याबाबत दक्षता घ्यावी असेही वळसे पाटील म्हणाले. घोडेगांव येथील आंबेगांव पंचायत समिती कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते.


खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणारे बियाणे चांगल्या दर्जाचे असावे. शेतकऱ्यांच्या  मागणीनुसार त्यांना खते, बियाणे व इतर निविष्ठा वेळेत मिळतील, याबाबत दक्षता घ्यावी असे वळसे पाटील म्हणाले. आदिवासी भागातील पाणी टंचाई असलेल्या गावात पाण्याचे टॅंकर सुरुच ठेवावेत. पंचायत समिती मधील बांधकाम, शिक्षण, आरोग्य अशा विविध विभागामधील रिक्त जागांचा आढावा घेऊन त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले आहेत. रोजगार हमी योजना, रमाई आवास योजनेचाही आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच घरकुल योजनांचाही आढावा घेण्यात आला.  संजय गांधी निराधार योजना गरजूंपर्यंत पोहोचवावी व लवकरच संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरीय समिती तयार करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 2021-22 च्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाई वाटपाबाबतही यावेळी त्यांनी आढावा घेतला. 


दरम्यान, राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार प्रमाणित बियाणांचा पुरवठा करण्याच्या सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी देखील दिल्या आहेत. बियाणांचा पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरुन सोयाबीनच्या बियाणांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे. तसेच तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी. कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश दादाजी भुसे यांनी दिले आहेत.


राज्यामध्ये खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. खरीप हंगाम 2022 मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे 146.85 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे.


महत्वाच्या बातम्या: