बेळगाव : जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्यांची विक्रमी आवक झाल्याने दरात घसरण झाली आहे. शनिवारी, एकाच दिवसात तीन हजार टनाहून अधिक रताळ्यांची आवक झाली. त्यामुळे प्रती क्विंटल आठशे ते बाराशे रुपयांना रताळ्यांची विक्री झाल्याचं दिसून आलं.
बेळगाव जिल्ह्यात रताळी आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे दरात घसरण झाल्याचं व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितलं.सध्या भात कापणी आणि मळणीची कामे संपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला सध्या शेतात दुसरे काही काम नाही. त्यातच फेंगुई चक्री वादळामुळे पावसाचे सावट देखील आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास शेतात रताळी बाद होऊन जातील म्हणून शेतकऱ्यांनी रताळी काढण्यास गडबड केल्याचं दिसून आलं.
त्याचा नकारात्मक परिणाम हा कृषी उत्पन्न बाजार समितीमवर झाला आणि रताळी आवक मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी दरात घसरण झाली. मागच्या आठवड्यात प्रती क्विंटल पंधराशे रुपये इतका रताळ्याचा दर होता. आता मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने रताळी दर कमी झाला.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेळगाव तालुका, खानापूर तालुका आणि चंदगड तालुक्यातून रताळ्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याची माहिती व्यापारी वाय.बी.चव्हाण यांनी दिली. परिणामी रताळ्याचा भाव घसरल्याने त्याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे.
सध्या जिल्ह्यात पावसाची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांनी रताळी काढण्याची घाई केली. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणावर झाली. सध्याचा दर आहे त्यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही अशी खंत कृष्णा गुरव या शेतकऱ्याने व्यक्त केली. बेळगाव येथून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथे रताळी पाठवली जातात.
ही बातमी वाचा :