APMC Election : कांदा, भाजीपाला, मिरची, कापसाची बाजार भावातील चढउतार, शेतकरी आंदोलनासाठी चर्चेत असणाऱ्या बाजार समित्या सध्या निवडणुकीमुळे  चर्चेत आहे. कोरोना आणि इतर कारणानं लांबलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे. शनिवारपर्यंत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे निकाल हाती येणार आहेत. 


ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा धुरळा  नुकताच शांत झाला, ग्रामपंचायत पाठोपाठ ग्रामीण भागाची नाळ जुळवून ठेवणारी निवडणूक म्हणून बाजार समतीच्या निवडणुकीच्या निवडणुकीकडे बघितले जात आहे. ग्रामीण भागावर वर्चस्व ठेवायचे असेल तर बाजार समिती ताब्यात ठेवली जात. आजवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती राहिल्या आहेत. ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असल्याने बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजप पुढे सरसावली असल्याने महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युती अशा लढती दिसत आहेत. बाजार समितीमध्ये रोज हजारो शेतकरी येत असतात, रोज होणारी लाखो कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्यानिमित्ताने शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी  फायद्यात ठरते. 


आगामी  जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून  या निवडणुकीला महत्व प्राप्त झालंय. स्थानिक पातळीवरचे आमदार, माजी आमदार आपला राजकीय दबदबा टिकवण्यासाठी या निवडणुकीत शड्डू ठोकुन उभे आहेत. यात कोणाची सरशी होणार, कोण कोणावर मात करणार, त्याचे राजकीय पडसाद काय उमटतात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहेत. 


नंदूरबारमध्ये 98 टक्के मतदान 


नंदुरबार जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान संपले. अक्कलकुवा बाजार समितीच्या अवघ्या दोन जागासाठी निवडणूक लागली असून 15 जागा बिनविरोध झाल्या आहेत. नंदुरबार, शहादा आणि नवापूर बाजार समितीसाठी  मतदानाची टक्केवारी वाढली आहे. नंदूरबारमध्ये 97.87 टक्के, शहादा 96.22 टक्के तर नवापूर 97.66 टक्के मतदान झालं आहे. तळोदा आणि धडगाव बाजार समिती बिनविरोध झाली आहे. 


बारामतीमध्ये 97 टक्के मतदान 


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण मतदान


बारामती - 97.37 टक्के
नीरा - 99 टक्के
दौंड - 99 टक्के
इंदापूर - 96.23 टक्के
इंदापूर, बारामती, दौंड आणि नीरा बाजार समितीचा निकाल शनिवारी लागणार असून सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. 


यवतमाळ- सात बाजार समिती अंतिम टक्केवारी


यवतमाळ- 96.79 टक्के
दिग्रस-  97 टक्के
नेर- 96 टक्के
बाभूळगाव -97.97 टक्के
वणी- 94 टक्के
पुसद -94  टक्के
महागाव-  91 टक्के 


एकूण सात बाजार समितीचे 4 वाजेर्यंत 95 टक्के मतदान झाले आहे.  एकूण 10,191 मतदारांपैकी 9,694 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.


सांगली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान आकडेवारी 


सांगली बाजार समिती :- 93 : 45 टक्के
इस्लामपूर बाजार समिती :- 86 : 57 टक्के
विटा बाजार समिती :- 91 : 30 टक्के


जळगाव जिल्ह्यामध्ये 12 बाजार समित्यांसाठी 94 टक्के मतदार


जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज जिल्ह्यातील  मतदान केंद्रावर 94.99 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण 29,369 मतदारांपैकी 27,889 मतदारांनी मतदान केले. सहा बाजार समित्यांची मतमोजणी उद्या शनिवारी तर उर्वरित सहा बाजार समित्यांची मतमोजणी रविवारी होणार आहे.


पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान टक्केवारी


मावळ - 98.27 टक्के
मंचर - 97.81 टक्के


नाशिक जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान प्रक्रीया पूर्ण झाली असून अनेक केंद्रावरील मतदान संपले आहे. मतपेटी सील करून सुरक्षित ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये नेल्या गेल्या आहेत. दुपारी 3 पर्यंत अंदाजे 80 ते 85 टक्के मतदान झाले असून यात काही मतांची भर पडणार आहे.